विठ्ठल मंदिरातील भाविकांच्या सुविधा आणि नागरिकांच्या हक्कांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार; नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र

पंढरपूर: शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेत मंदिर परिसरातील विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाळ्यापूर्वी मंदिरातील अपुरी राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.

मंदिर परिसरात काही ठिकाणी अद्याप पाणी गळती होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत पुरातत्त्व विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले. तसेच वाढत्या भाविकसंख्येचा विचार करून स्वतंत्र विद्युत आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त केली. महिला भाविकांसाठी हिरकणी कक्षात आसनव्यवस्था व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी मंदिर व्यवस्थापन समितीला दिल्या.

दरम्यान, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या शिष्टमंडळाने प्रस्तावित मंदिर कॉरिडॉरबाबत डॉ. गोऱ्हे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कॉरिडॉर प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या नागरिकांच्या घर, जमीन आणि उपजीविकेचा विचार करूनच प्रकल्प राबविण्याची मागणी करण्यात आली.

यावर प्रतिक्रिया देताना डॉ. गोऱ्हे यांनी विकासकामांसोबत स्थानिक नागरिकांच्या हिताचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. कॉरिडॉर प्रकल्पामुळे किती घरे, दुकाने व जमीन बाधित होणार याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आवाहन करत नागरिकांच्या अडचणींबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या भेटीदरम्यान मंदिर परिसरातील सुविधा, भाविकांच्या सोयीसुविधा आणि कॉरिडॉर प्रकल्पाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत