विमा कंपन्यांशी बोलून लवकर भरपाई देता येईल का?

महाराष्ट्र

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांना सूचना

मुंबई: शेतकरी अपघाती विमा अंतर्गत विमा कंपनीकडून मिळणारी भरपाईसाठी जवळपास सात वर्षे थांबायला लागते. त्याकरता विमा कंपनी आणि गृहविभागाशी बोलून लवकरात लवकर विम्याचा मोबदला देता येईल का यासाठी प्रयत्न करण्याची सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना केली.

लक्षवेधी प्रश्नादरम्यान आ. गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील अनेक विमा कंपन्या शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव नाकारत आहेत. हे सर्व प्रस्ताव मान्य करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे विचारण्यात आले होते. या प्रश्नाला जोडूनच उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांना शेतकरी अपघात विमा संदर्भात सूचना केली.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे प्रेत सापडत नाहीत. डोळ्यासमोरून प्रेत वाहत गेलेली असतात. पण दुर्दैवाने ती प्रेतं सापडत नाहीत. अशावेळी जवळपास सात वर्षे थांबायची वेळ येते. त्यामुळे विमा कंपनी आणि गृहविभागाशी बोलून त्यांना त्यामध्ये कशा प्रकारे भरपाई देता येईल. याबाबत विमा कंपनीशी बोलून कायदेशीर सल्ला घेऊन सात वर्षाची मर्यादा कमी करता येईल का ? अशी विचारणा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. यावर कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांनी, सरकारच्या वतीने काही वर्षे कमी करण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल असे सांगण्यात आले.