मुंबई: ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सखोल अभ्यास असलेले ज्येष्ठ पत्रकार व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा सखोल अभ्यास असलेल्या प्रताप आसबे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. राजकारणाकडे अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व पत्रकारिता क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरले, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक अभ्यासू आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.