माजी मंत्री अशोकराव पाटील डोणगावकरांच्या निधनाने समर्पित लोकसेवक हरपला

महाराष्ट्र

मुंबई: काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील डोणगावकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस विचारांचे एक समर्पित नेतृत्व व लोकसेवक हरपला आहे अशा शोकभावना महराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

अशोक पाटील डोणगावकर यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, डोणगावकरांनी ग्रामपंचायतीपासून सक्रीय राजकारणाला सुरुवात केली. ते सरपंच, दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचे संचालक, गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास संघर्षशील आणि प्रेरणादायी आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकीय, शैक्षणिक, कृषी, सहकार, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असत. आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे या तळमळीने ते सातत्याने विकास कामांचा पाठपुरावा करत.

अशोकराव डोणगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डोणगावकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.