शिरूर भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी प्रकरणात मोठा घोटाळा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

आर्थिक तडजोडीचे आरोप, चौकशीची मागणी जोरात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत असून, पैशांच्या मोबदल्यात निवडक प्रकरणांना प्राधान्य देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांतून होत आहे. आर्थिक तडजोडी झालेल्या प्रकरणांची मोजणी इतर प्रकरणांवर अघोषितरीत्या प्राधान्य देत लवकर पूर्ण करण्यात आली असल्याचे सुजाण नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

अनेक प्रकरणांमध्ये मोजणी न करता, हद्द कायम न करता थेट ‘क’ प्रत तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून, संबंधित अधिकार्‍यांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यासोबतच, कार्यालयात एसीमध्ये बसून शासकीय थाटात वावरणाऱ्या अधिकाऱ्यांनी, बेकायदा झिरो कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट चालविल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या झिरो कर्मचाऱ्यांची नेमणूक कोणाच्या आदेशाने केली. त्यांचा पगार कोण करतो? यावरही अजून गूढ कायम आहे.

या सर्व गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक, शेतकरी वर्ग व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. अन्यथा, सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोज सय्यद, मनसेचे अविनाश घोगरे यांच्यासह कार्यकर्ते तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत.

शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराचा छडा लावावा, अशी जनतेची ठाम मागणी आहे. अन्यथा उद्रेक अनिवार्य आहे.( क्रमशः)