शिरूर महावितरणच्या उपकार्यकारी अभियंतापदी शरद माने

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूरच्या महावितरणच्या उपकार्यकारी अभियंतापदी सुमित जाधव 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर महावितरण विभागाच्या उपकार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार शरद माने यांनी नुकताच स्वीकारला असून, यापूर्वी त्यांनी बारामती व मुंबईसारख्या महत्वाच्या ठिकाणी प्रभावीपणे काम केलेले आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे शिरूर विभागातील वीज व्यवस्थापन अधिक सक्षम आणि गतिमान होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या पदावर कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता सुमीत जाधव यांची शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे बदली झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. आपल्या कार्यकाळात जाधव यांनी महावितरणच्या विविध योजना प्रभावीपणे राबवत ग्राहकसेवा व वीज वितरणात उल्लेखनीय सुधारणा केल्या. त्यांच्या कार्यपद्धतीची प्रशंसा शिरूरकरांनी अनेक वेळा केली होती. शिक्रापूर येथील उपकार्यकारी अभियंता महाजन यांची बदली झाल्यानंतर जाधव यांनी कार्यभार हाती घेतला आहे.

शरद माने यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, “शिरूर विभागात महावितरणच्या वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. स्थानिक पातळीवरील वीज समस्या समजून घेऊन, त्या वेळेत सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.”तसेच, आगामी काळात महावितरणच्या डिजिटल सेवा, वीज चोरी प्रतिबंध, ग्राहक जनजागृती व इतर योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुक्यातील वाढती वीज मागणी, नागरी व औद्योगिक विस्तार लक्षात घेता माने व जाधव यांचा अनुभव निश्चितच उपयुक्त ठरेल, असे मत वीज ग्राहक तसेच सहकारी कर्मचारी व्यक्त करत आहेत. महावितरणच्या या नव्या दोन नेतृत्वामुळे शिरूरच्या वीज सेवेतील गतिमानता आणि पारदर्शकता वाढेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे.