भाजपला मोठा धक्का! मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाजपमध्ये बंडाची ठिणगी

राजकीय

कल्याण-डोंबिवली : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय दुर्गेश बागुल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

डोंबिवलीतील जोंधळे हॉल येथे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बागुल यांच्या पक्षांतरामुळे कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नंदू परबांच्या वक्तव्यावरून नाराजी

भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना उत्तर भारतीय नेत्याचा दाखला दिला होता. या वक्तव्यावर दुर्गेश बागुल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे यांच्यावर राजकीय टीका करण्यास हरकत नाही; मात्र परप्रांतीय नेत्यांचा आधार घेऊन मराठी अस्मितेला कमी लेखणे योग्य नाही, अशी भूमिका बागुल यांनी मांडली.मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही, असे सांगत त्यांनी नंदू परब यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.

‘१५ कोटी मराठी जनतेची माफी मागा’

नंदू परब यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, मात्र ही माफी केवळ एका व्यक्तीची नसून महाराष्ट्रातील १५ कोटी मराठी जनतेची मागावी, अशी मागणी दुर्गेश बागुल यांनी केली. मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा हा केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून तो मराठी जनतेच्या भावनेशी जोडलेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपमध्ये गटबाजीचा आरोप

भाजपमध्ये नेतृत्वाचा अभाव, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि पक्षांतर्गत गटबाजी असल्याचा आरोपही बागुल यांनी केला. मराठी भाषेच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका आपल्याला मान्य नसल्याने भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कल्याण-डोंबिवलीतील आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत