आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) आणि ब्लॅक पँथर या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांची परंपरा जपणाऱ्या या पक्षाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सर्व सहकारी पक्षांचे आभार मानले. भविष्यातील सर्व निवडणुका एकत्रितपणे लढवून आघाडी अधिक मजबूत करण्याचा विश्वासही यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव विकास लवांडे, मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्ष मिलिंद कांबळे, सहअध्यक्ष सोहेल सुभेदार, प्रदेश प्रवक्ते महेश चव्हाण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयु. बाळासाहेब पवार उपस्थित होते.

शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, येणाऱ्या निवडणुका या जनतेच्या आहेत. त्यामुळे ठराविक अजेंड्यावर आधारित लढत देण्यात येणार आहे. विशेषतः मुंबईच्या निवडणुकीला अत्यंत महत्त्व असून, प्रचारासाठी इतर राज्यांतील नेत्यांना बोलावले जात असल्याने प्रांतवाद, भाषिक वादानंतर आता धर्मवादाचा मुद्दा पुढे येतो आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही पक्ष परप्रांतीय नेत्यांच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचे मनसुबे आखत असून, त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईच्या विभाजनाची शंका निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र राज्यात राहणाऱ्या सर्व जनतेला एकत्र घेऊनच मुंबईची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले असे शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.

शशिकांत शिंदे म्हणाले की, पक्षातून कोणी बाहेर पडल्यास त्याचा फारसा परिणाम होत नाही. रिक्त झालेल्या जागा भरून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न राहील. पक्ष सोडून जाण्यापासून कुणालाही कधी रोखले नाही. जे गेले ते त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले की, मुंबईला एकूण ११ जागा मिळाल्या आहेत. त्यातील ४ जागा आम्ही स्वबळावर लढत आहोत. काही जण उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्ष सोडून गेले आहेत. अनेक ताकदीच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची होती पण वस्तुस्थिती पाहता आम्ही देऊ शकलो नाही. अशी खंत यावेळी बोलताना शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, वचिंतसोबत कोल्हापूर, जळगाव, सांगली, अमरावती, तीन चार ठिकणी आम्ही एकत्र निवडणुक लढवणार आहोत. आमच्याकडे बंडखोरी झालीच नाही. माघार घेतल्यानंतर निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. असे शशिकांत शिंदे म्हणाले.

शशिकांत शिंदे म्हणाले की, दरम्यान, मुंबईत मराठा महापौर होणार अशी वक्तव्ये सध्या होत असली तरी आजचे राजकारण हे धर्म आणि भाषेच्या मुद्द्यांवर चालली आहे. ही एक राजकीय रणनीती आहे. प्रत्येक पक्षाने आपली स्पष्ट भूमिका मांडावी, असे आवाहनही यावेळी शशिकांत शिंदे यांनी केले.