शिंदे गटाने प्रथम न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दयावे: अंबादास दानवे

राजकीय

जालना: देशाच्या सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला ‘तुम्ही कोण आहात’ असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे त्यांनी आधी त्या प्रश्नाचे उत्तर दयावे, त्यानंतर इतर प्रश्नांचा निकाल लागेल. शिवसेनेचा आणि निवडणुकांचा धसका घेतल्याने त्यांनी रिट याचिका दाखल केली असल्याची सडकून टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केली.

जालना येथे ते माध्यमांशी बोलत होते. याशिवाय शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याची मागणी सुप्रीम कोर्टात केलीय, त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, याचा अर्थ त्यांना आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची भीती वाटतेय. शिवाजी पार्क सरकारला ब्लॉक करता येणार नाही राज्यात लोकशाही आहे, सरकारीची दादागिरी चालणार नाही तर जनतेची दादागिरी चालते. गेल्या ५६ वर्षांपासून सातत्याने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे.

यावेळी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत सरकारला जनतेच्या मतानुसार वागावं लागतं. लोकशाहीत दादागिरी करुन चालत नाही, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट हल्लाबोल केला आहे. संभाजीनगर येथे आयकर विभागाने टाकलेल्या धाडीवर बोलताना दानवे म्हणाले की, जनता भाजपला बंधन नाही, त्यामुळे ईडी, सीबीआय, आयकर सारख्या शासकीय यंत्रणांचा वापर करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.