महिलेला मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना जीवनभराची घडली अद्दल!

राजकीय

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मुजोरीचा एक संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये मनसे कार्यकर्त्याने पोस्टर लावण्याच्या कारणावरुन एका महिलेला मारहाण केली. त्याने आधी महिलेच्या कानशिलात लगावली आणि तिला धक्काबुक्कीही केली. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आपल्या भाषणात महिला सुरक्षेविषयी बोलणारे राज ठाकरे या कार्यकर्त्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

दरम्यान महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मनसेने आपल्या मुजोर कार्यकर्त्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विनोद अरगिले नामक पदाधिकाऱ्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. नागपाडा पोलिसांनी तीनही आरोपींना आज शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केलं होतं.

नागपाडा पोलिसांनी तिनही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. यानंतर आरोपीच्या वकिलांनी जामीनासाठी याचिका दाखल केली. ज्यावर कोर्टाने निर्णय घेतला आणि तिघांनाही जामीन मंजूर केला. तीन आरोपींना शिवडी मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. कोर्टाने तीन आरोपींना 15 हजार रुपयांच्या दंडावर जामीन दिला आहे.

नेमकं काय घडलं होतं? मुंबईतील मुंबादेवी परिसरातील एका महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. पोस्टर लावण्यावरुन हा वाद सुरु झाला होता. महिलेने आपल्या दुकानासमोर हा पोस्टर लावण्यास नकार दिला होता. यानंतर कार्यकर्त्याने महिलेला मारहाण केली. त्याने तिच्या कानशिलात लगावली. या भांडणात विनोद अरगिले याने महिलेला धक्काबुक्की केल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.