सरदवाडी येथे रस्ता ओलांडताना कंटेनरच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पुणे-नगर रस्त्यावर भेळी साठी प्रसिद्ध असणाऱ्या सरदवाडी गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या शेजारीच असणाऱ्या रस्त्यावर दुभाजकाच्या ठिकाणी गतिरोधक बसवावा अशी सातत्याने मागणी होत असुन 9 ऑक्टोबर रोजी येथे रात्री 8 च्या सुमारास रस्ता ओलांडताना कंटेनरने धडक दिल्याने अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असुन सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे.

पुणे-नगर या राष्ट्रीय महामार्गाला सरदवाडी येथे तीव्र स्वरूपाचा उतार असल्याने पुण्यावरून नगरकडे जाणाऱ्या वाहनांना रस्ता ओलांडून जाणाऱ्या व्यक्ती दिसत नाही. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मराठी शाळा, माध्यमिक विद्यालय, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिर तसेच शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी पुरुष महिला यांची सतत ये-जा असते त्यामुळे मुलांना ग्रामस्थांना आपला जीव मुठीत धरून पुणे-नगर हा राष्ट्रीय महामार्ग पार करावा लागतो. शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत असल्याने तातडीने या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी दलित स्वयंसेवक संघाचे शिरूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव आणि अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गणेश सरोदे यांनी केली आहे.

सरदवाडी येथे दि 9 ऑक्टोबर 2022 रोजी कंटेनर क्रं एम.एच 12 एच.डी 4278 ची धडक बसल्याने कन्हैयालाल हस्तीमल फिरोदिया (वय 78) रा.गोंगलेगल्ली कोर्टाजवळ, अहमदनगर या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने या ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बसवावा अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांनी केली असुन याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शेळके यांच्याशी संपर्क साधला असता पुढील आठ दिवसात पुणे-नगर महामार्गावर अशा धोक्याच्या ठिकाणी सगळीकडे पांढरे पट्टे मारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.