शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर न्यायालयाच्या आवारात शिरुर तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने दारु पिऊन धिंगाणा घालुन शिविगाळ करण्याची घटना ताजी असतानाच पुन्हा न्यायालयासमोर मित्र-मैत्रिणीमध्ये हाणामारी झाल्याची घटना (दि १८) जुलै रोजी घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयाची सुरक्षा ऐरणीवर असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, एका २२ वर्षीय महीलेचे (रा. श्रीरामपुर, जि.अहिल्याअनगर सध्या रा. शिक्रापुर, ता.शिरुर, जि. पुणे) लग्न २०२० साली राजेंद्र जाधव यांच्यासोबत झाले असुन ती सध्या त्याच्या सोबत राहात नसुन ती आई-वडील यांच्याकडे राहण्यास असते.
गुरवार (दि १८) जुलै रोजी ती तिच्या घटस्फोटाच्या केस संदर्भात शिरुर न्यायालयात दुपारी ५ च्या दरम्यान तिच्या ओळखीचा विजय मछिंद्र निकम (रा. श्रीरामपुर,दत्तनगर, ता. श्रीरामपुर, जि.अहिल्यानगर) या मित्रासोबत आली होती. कोर्टात यायला वेळ लागल्याने ती त्याला अजुन थोडा वेळ थांब असे म्हणाली असता त्याने रागाच्या भरात तिला कोर्टाच्या बाहेरील आवारात गालावर चापट मारुन मारहाण केली.
त्यावेळी तिथे आसपासचे लोक जमा झाले. त्यानंतर तेथील पोलीस व वकील तिला व विजय याला बाजुला घेवुन गेले. थोडया वेळात महीला पोलीस व इतर पोलीस तेथे आले व त्यांच्या सोबत ती शिरुर पोलीस स्टेशन येथे आले. तिच्या ओळखीचा विजय मछिंद्र निकम (रा. श्रीरामपुर,दत्तनगर, ता. श्रीरामपुर, जि.अहिल्यानगर) याने रागाचे भरात मला चापट मारली असुन माझी त्याच्या विरुद्ध काहीएक तक्रार नसल्याचा जबाब तिने शिरुर पोलिस स्टेशन येथे दिला आहे. त्यामुळे विजय याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ अन्वये खटला भरुन कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत शिरुर पोलीस स्टेशनच्या बेजबाबदार, भोंगळ कारभारावर शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वसामान्य नागरिक नाराज असून शिरुर पोलीस स्टेशन येथे सक्षम अधिकारी यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिकांना शिरुर पोलीस स्टेशन येथे तक्रार करावी कि शिरुर पोलिसांची तक्रार करावी असा प्रश्न पडलेला आहे अशी खोचक प्रतिक्रिया अॅड सुमित देवीदास पोटे यांनी दिली आहे.
शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचाचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?