शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचाचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला असुन काही महिन्यांपुर्वी शिरुर न्यायालयाच्या आवारात एका माजी सैनिकाने स्वतःच्या पत्नीवर गोळ्या झाडत तिची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

 

काल मंगळवार (दि १६) रोजी दुपारी ५ च्या सुमारास करडे (ता. शिरुर) येथील माजी उपसरपंच आणि स्वयंघोषित ‘गोल्डमॅन’ अंकुश बांदल यांनी दारुच्या नशेत शिरुर न्यायालयाच्या आवारात धिंगाणा घालत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना पोलिसांनी अजुनही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नसल्याने शिरुर पोलिसांवर कोणता राजकीय दबाव आहे का अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे.

 

याबाबत मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, मंगळवार (दि १६) रोजी दुपारी ५ च्या सुमारास करडे गावचे माजी उपसरपंच आणि स्वयंघोषित ‘गोल्डमॅन’ अंकुश बांदल यांनी शिरुर न्यायालयाच्या आवारात दारुच्या नशेत धिंगाणा घालत शिवीगाळ केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही वकिलांनी अंकुश बांदल यांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु बांदल यांनी शिवीगाळ चालुच ठेवली. त्यानंतर शिरुर न्यायालयातील एका न्यायाधिशांनी (नाव माहित नाही) कोर्ट पोलीस कर्मचाऱ्याला बांदल यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले.

 

परंतु शिरुर पोलिसांनी बांदल यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. अंकुश बांदल यांच्यावर यापूर्वीही शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील काही गुन्ह्यात बांदल हे जामीनावर बाहेर आहेत. आता त्यांनी शिरुर न्यायालयाच्या आवारात शिवीगाळ करुनही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली का…? कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर कोणता राजकीय दबाव आहे का…? अशी सगळीकडे दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु आहे.

शिरुर तालुक्यात बोगस बियाण्याने शेतकरी हतबल; अधिकारी वसुलीत मग्न

शिरुरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप, विनापरवाना झाडे पाडत केले बांधकाम; कारवाई करा, नागरीकांची मागणी

शिरुर-पाबळ रस्त्यासाठी होतोय चक्क मातीचा वापर; सार्वजनिक बांधकाम उपविभाग निद्रीस्त