कान्हूर मेसाईच्या विद्याधाममध्ये टाळमृदुंगाचा गजर

शिरूर तालुका

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अनोखे कीर्तन

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून अनोख्या पद्धतीने कीर्तन संपन्न झाले असल्याने विद्याधाम मध्ये टाळमृदुंगाचा गजर झाला आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने विद्यालयाचे माजी विद्यार्थी ह.भ.प. विश्वास महाराज गाडगे यांचे कीर्तन आयोजित केले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गंगाधर पुंडे, सचिव सुदाम तळोले, संचालक शहाजी दळवी, प्राचार्य अनिल शिंदे, पर्यवेक्षक साहेबराव आंधळे यांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले.

दरम्यान कीर्तनकार विश्वास महाराज गाडगे यांनी कीर्तनातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचा आढावा घेतला. तर विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून चारित्र्यसंपन्न व निर्मल जीवन कसे जगावे तसेच राजमाता जिजाऊ यांच्याकडून आदर्श मुले कधी घडवावीत याचे ध्येय समोर ठेवावे. त्यांचे विचार आजही काळाशी सुसंगत आहेत हा ह्या महान व्यक्तिमत्त्वांचा दुरदर्शीपणा असल्याचे सांगितले. विद्यालयाने किर्तनासारख्या उपक्रमाचे आयोजन करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे असे माजी सरपंच रामदास मांदळे यांनी सांगितले.

किर्तनासाठी ह. भ. प. बाबूराव महाराज तळोले, नाथा मिडगुले, आकाश महाराज पाटील, स्वप्नील टाकळकर, सुभाष महाराज जैद, नितीन महाराज सुक्रे, अक्षय महाराज बालवडे, कृष्णा महाराज मांदळे, स्वराज्य महाराज खैरे, बाळासाहेब तांबे यांनी साथसंगत केली. सर्व संतजनांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक मोरे व प्रकाश चव्हाण यांनी केले, तर प्रा. अनिल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले