आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर दि.१२ ( अरुणकुमार मोटे): शिरूर येथील एका गृहिणीला स्टेट बँकेच्या नावाने बनावट एफ.डी. आणि पॉलिसी देण्याचे आमिष दाखवून तब्बल २१ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कल्पना अंकुश ढोरमले (वय ५०) रा. ओम रूद्र कॉलनी, शिरूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन २०२२ ते डिसेंबर २०२४या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडिया, शिरूर शाखेत येऊन एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे काम पाहणाऱ्या विकास गुलाब बेलदार (रा. चरोली, पुणे) या इसमाने त्यांना बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त व्याज देणाऱ्या एफ.डी. व नवीन पॉलिसीचे आमिष दाखवले.
फिर्यादी यांच्याकडून विकास बेलदार याने सहा ब्लँक चेक घेतले आणि कोणतीही खरी पॉलिसी अथवा एफ.डी. सुरू न करता खोट्या पावत्या देत बनावट कागदपत्रांद्वारे विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी चेक वटवून फिर्यादी यांच्या बँक खाती क्र. 35554265989 मधून त्याने स्वतःच्या खाती क्र. 33881261294 मध्ये एकूण 21,45,000/- रुपये जमा करून फसवणूक केली.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास म.पो.स.ई. झेंडगे मॅडम करत असून, प्रभारी अधिकारी पो.नि. केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.