शिरूर (अरुणकुमार मोटे): “शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे ठिकाण नाही, तर ती आठवणींची ठेव असते” हे विधान खरं ठरवत १९८६ साली दहावीमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा शाळेत हजेरी लावली. मलठण येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मलठण मध्ये ६० माजी विद्यार्थी एकत्र जमून आपल्या बालपणाच्या आणि शालेय जीवनाच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. पन्नाशीत पोहोचलेले हे विद्यार्थी, पुन्हा एकदा त्या जुन्या बाकांवर बसले, वर्गातल्या किस्स्यांवर मनमुराद हसले आणि एकमेकांना घट्ट मिठी देत जुन्या मैत्रीला नवा अर्थ दिला.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याकाळचे शिक्षकही यावेळी विद्यार्थ्यांप्रमाणेच सहभागी झाले. अभिनंदन जैन सर, नारायण निकम सर, बजरंग कदम सर, वासुदेव थोरात सर, तसेच सेवक महामुनी आणि ढोणे यांनी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना आशीर्वाद दिले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य चंद्रकांत वाव्हळ सर, गावातील आदरणीय सेवानिवृत्त शिक्षक सुदाम गायकवाड आणि सुरेश गायकवाड सरांनी देखील उपस्थित राहून या अनोख्या स्नेहमेळाव्याची शोभा वाढवली.
सध्याच्या मुख्याध्यापिका आसवले मॅडम यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेस भेटवस्तू म्हणून इन्व्हिटर दिला. तसेच उपस्थित शिक्षक आणि मित्रमैत्रिणींना फेटा बांधून आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी अशोक भुजबळ, संदीप जैन, लतिका वाव्हळ, विलास गोसावी, राजू कांकरिया, बाळासाहेब आसवले, भरत गायकवाड, राजेंद्र भोसले, जयसिंग थोरात, बाबासाहेब धायबर, सुभाष राजगुरु, अनिल भोसले, राजेंद्र क्षीरसागर, संदीप धामणे, प्रदीप देवकाते, प्रदीप हडतगुणे, फक्कड सांबारे, भगुजी फलके यांच्यासह १९८६ च्या सर्व बॅचने विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप जैन यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब आसवले यांनी उत्साहीपणे निभावले. विद्यार्थी प्रतिनिधी मनोगतअशोक भुजबळ यांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शन भरत गायकवाड यांनी केले. हा अनोखा स्नेहमेळावा म्हणजे “काळाच्या प्रवाहातही मैत्रीचा धागा तुटत नाही”, याचा सुंदर अनुभव ठरला.