शिक्रापूरची वेळ नदी ऐन उन्हाळ्यात तहानलेली

शिरूर तालुका

वेळ नदीला चासकमान पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वेळ नदी पूर्णपणे कोरडी ठणठणीत झालेली असल्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली असल्यामुळे गावाला पायाच्या संकटाचा सामना करण्याची वेळ आल्याने वेळ नदीला चासकमान कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी शिक्रापूर ग्रामपंचायत सह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथून वाहणाऱ्या वेळ नदीच्या पाण्यामुळे शिक्रापूर गावासह परिसरातील वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच येथील अनेक वाड्या वस्त्यांवरील शेतीचे तसेच नागरिकांचे पाण्याचे स्त्रोत अवलंबून आहे, या वेळ नदीला पाणी असल्यास या परिसरातील सर्व विहिरींची पाण्याची पातळी वाढलेली असते त्यामुळे नागरिकांना देखील शेतीतील पिकांना पाणी देणे शक्य होत असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी सोय होत असते. तसेच या नदीचे बंधारे भरलेले असल्यास गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पातळी वाढलेली असल्यामुळे ग्रामस्थांना योग्य पद्धतीने पाणी वाटप होत असते.

परंतु सध्या वेळ नदी पूर्णपणे कोरडी पडलेली असून या नदीवर असलेले शिक्रापूर परिसरातील सर्व बंधारे देखील कोरडे पाडलेले आहे तसेच उन्हाची तीव्रता वाढत चाललेली असल्यामुळे आता नागरिकांना पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे. त्यामुळे येथील वेळ नदीला चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी शिक्रापूर सह आजूबाजूच्या गावांच्या ग्रामपंचायत तसेच शेतकरी संघटना तसेच काही संघटनांच्या माध्यमातून चासकमान विभागाकडे करण्यात येत आहे.

यापूर्वी अनेकदा याबाबत चासकमान विभागाकडे पत्रव्यवहार करुन देखील वेळ नदीला पाणी सोडण्यात आलेले नसल्याने शेतकरी संघटनेने चासकमानच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. सध्या वेळ नदीला पाणी नसल्याने अनेक विहिरीची पातळी खालावली असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहण्याची चिन्हे निर्माण झाली तातडीने वेळ नदीमध्ये चासकमान कालव्याचे पाणी सोडावे अशी मागणी करण्यात येत आहे.

चासकमान मधून पाणी सोडण्यात आलेले आहे; सुनील म्हस्के (शाखा अधिकारी)

शिक्रापूर ग्रामपंचायत तसेच काही संघटना यांनी निवेदन दिलेले आहे, मात्र चासकमान मधून वेळ नदीला पाणी सोडण्यात आलेले असून लवकरच शिक्रापूर सह तळेगाव ढमढेरेला पाणी पोहचेल चासकमान विभागाचे शाखा अधिकारी सुनील म्हस्के यांनी सांगितले.