जातेगाव बुद्रुक मध्ये आढळले बिबट्याचे चार बछडे

शिरूर तालुका

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेकडून पिलांची सुरक्षितता

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका शेतात उसतोड सुरु असताना उसतोड कामगारांना उसाच्या शेतात चक्क चार बिबट्याची पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली असून वनविभाग तसेच निसर्व वन्यजीव सामाजिक संस्थेच्या सभासदांनी सदर ठिकाणी धाव घेत पिल्लांना सुरक्षित स्थळी ठेवले आहे.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील सुरेश इंगवले यांच्या शेतात उसतोड सुरु असताना उसतोड कामगारांना अचानकपणे बिबट्याची पिल्ले दिसून आले, याबाबतची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळताच वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख, संचालक दत्ता कवाद, अमोल कुसाळकर, पूजा बांगर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता बिबट्याची चार पिल्ले असून एक पिल्लू मृत झाल्याचे दिसून आले. यावेळी सरपंच किशोर खळदकर, उपसरपंच गणेश उमाप, ग्रामपंचायत राहुल पवार, सामाजिक कार्यकर्ते अनिल इंगवले, राहुल क्षिरसागर, सुनील वारे, रतिकांत उमाप, सुरेश इंगवले यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी वनरक्षक तसेच निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या सभासदांनी बिबट्याच्या तीन बछड्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले तर एका मृत बछड्याला छवविच्छेदन सह पुढील कार्यवाही साठी शिरुर वनपरिक्षेत्र कार्यालय येथे पाठवून दिले असून यावेळी बोलताना सदर पिल्ले खूप लहान असून रात्रीच्या सुमारास त्या पिलांची आई असलेली बिबट मादी पिलांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करेल, असे वनरक्षक बबन दहातोंडे यांनी सांगितले.

उसतोडी मुळे बिबट्यांचे अस्तित्व धोक्यात…

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्यांना निवारा भेटत असून त्याच ठिकाणी भक्ष देखील मिळत असतात, सध्या बिबट्यांचा प्रजनन काळ असताना उसतोड देखील सुरु आहे त्यामुळे बिबट्यांची पिल्ले आढळून येत आहेत तसेच उसतोड मुळे बिबट्यांचे अस्तित्व देखील धोक्यात येत असल्याचे निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांनी सांगितले.