शिक्रापूर (शेरखान शेख): महसूल खात्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य महिला कार्यकर्त्यांनी करावे तसेच ग्राहक प्रबोधनाच्या राष्ट्रीय कार्यात महिलांचे योगदान आनंददायी असल्याचे मत शिरुरच्या नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी यांनी व्यक्त केले.
जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्त आयोजित महिला ग्राहक मेळाव्यात मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी बोलत होत्या. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे मध्य प्रांत संघटक रमेश टाकळकर, शिरुर तालुकाध्यक्ष देवेंद्र जगताप, शिरुर तालुका महिला संघटक रोहिणी दरेकर, सरपंच नंदा रणपिसे, प्रतीक्षा निकाळजे, पर्वतराज नाबगे, संदेश कळमकर, दत्ता ननवरे, पंडित मासळकर यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान स्नेहा गिरीगोसावी यांनी यांनी संजय गांधी निराधार योजना वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, क्षतपूर्ती योजना, सामाजिक सुरक्षा योजना, बळीराजा विमा योजना, श्रावण बाळ सेवा योजना यांसह आदी योजना तहसील कार्यालयामार्फत लाभार्थ्यांना देण्यात येतात असे सांगत वारस नोंदणी करार, खातेवाटप खरेदी खताची नोंद साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही असे देखील स्नेहा गिरीगोसावी यांनी सांगितले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे मध्य प्रांत संघटक रमेश टाकळकर यांनी विद्युत अपघात व नुकसान भरपाई याबाबत माहिती उपस्थितांना देत प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या योजना सांगून नैसर्गिक प्रसूती बाबत महिलांनी आग्रही राहिल पाहिजे असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरुर तालुकाध्यक्ष देवेंद्र जगताप यांनी केले तर रोहिणी दरेकर यांनी आभार मानले.