snake

शिरूर तालुक्यात पुन्हा विषारी सर्पदंशाने दुभत्या गायीचा मृत्यू…

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या रोहिलवाडीत घोणस सर्प नदीकिनारी शेतालगत चारत असलेल्या दुभत्या जर्शी गायीस चावल्याने काही मिनीटातच त्या गायीचा सापाच्या विषबाधेने दुर्दैवी मृत्यू झाला. सर्प दंशाने मोठी गाय क्षणार्धात दगावल्याने शेतकरी किसन केरू रोहिले यांचे सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज (बुधवार) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

कवठे येमाईच्या रोहिलवाडीतील शेतकरी किसन केरू रोहिले यांचा मुलगा सागर हा नेहमी प्रमाणे ४ गाया घेऊन नदी किनारी चारण्यासाठी घेऊन गेला होता. शेतीनजीक जनावरे चारीत असताना त्यातील एका दुभत्या गायीने अचानक उडी मारली व सुमारे पन्नास फूट दूर पळत येत जमिनीवर कोसळली. घोणस सारख्या अति विषारी सर्पाचा तोंडास दंश झाल्याने त्या गायीचा काही वेळातच दुर्दैवी मृत्यू झाला. ही गाय दररोज अठरा लिटर दूध देणारी होती. तिचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याने सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी किसान रोहिले यांनी दिली.

“कवठे गावकामगार तलाठी ललिता वाघमारे यांना घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पुढील कार्यवाही साठी हा प्रस्ताव शिरूर तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येईल.”
– माधुरी बागले, मंडल अधिकारी, मलठण.

“मागील दहा दिवसात कवठे येमाई शिवारात विषारी सर्प चावून गाय मृत्युमुखी पडण्याची ही दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे. परिसरात पडत असलेल्या पावसाने मुबलक हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. सर्प दंशाने रोहिलवाडीत आज गायीचा मृत्यू झाल्याची घटना दुःखदायक आहे. शेतकऱयांनी आपली जनावरे नदीकिनारी, शेतानजीक चरावयास नेताना जनावरांची व आपली दक्षता घेणे गरजेचे आहे.’
– विलासराव रोहिले, सामाजिक कार्यकर्ते, कवठे येमाई.