रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे यंदाच्या भाद्रपद गणेशोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रविवार (ता. २४ ऑगस्ट) पासून यात्रेला सुरुवात होत असून, हा सोहळा शनिवार (ता. ३० ऑगस्ट) पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. भाविकांना महागणपतीचे मुक्तद्वार दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
मुक्तद्वार दर्शनाचे वैशिष्ट्य…
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविकांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून थेट श्री महागणपतीच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. ही पर्वणी भाविकांसाठी अतिशय दुर्मिळ असल्याने मोठ्या संख्येने भक्त येथे दाखल होतात.
पालखी सोहळे आणि द्वारयात्रा…
- रविवार (दि. २४) पहाटे ३ वाजता मंदिराचे द्वार उघडले जाईल. सकाळी ११ वाजता पालखी पूर्वद्वारातून करडे गावाकडे रवाना होईल.
- सोमवार (दि. २५) सकाळी १० वाजता पालखी दक्षिणद्वारातून निमगाव महाळुंगी येथे जाणार.
- मंगळवार (दि. २६) सकाळी १० वाजता पश्चिमद्वारातून गणेगाव येथे पालखी प्रस्थान करणार.
- बुधवार (दि. २७) गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी १२.१५ वाजता उत्तरद्वारातून ढोकसांगवी गावाकडे पालखी प्रस्थान करेल.
या चारही गावांत रांजणगावचे ग्रामस्थ व भाविक बालगोपालांसह अनवाणी पायी द्वारयात्रा करतात, ही अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे.
भाविकांसाठी सुविधा व सुरक्षा व्यवस्था…
भाविकांसाठी दर्शनबारी, पिण्याच्या पाण्याची सोय, पार्किंग आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेच्या काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी सज्ज आहेत.
धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम…
संपूर्ण आठवडाभर विविध धार्मिक विधी, कीर्तन, भजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, मुख्य विश्वस्त ओंकार देव, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर पाटील, खजिनदार विजय देव, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, संतोष रणपिसे व पुजारी मंडळी यांनी भाविकांसाठी भव्य आयोजन केले आहे. त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महागणपतीचे मुक्तद्वार दर्शन व धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
नक्की काय आहे रांजणगाव गणपतीचा इतिहास…?