jategaon school

श्री संभाजीराजे विद्या संकुलात ‘हर घर तिरंगा’ अभियान…

शिरूर तालुका

शिक्रापूरः ‘देशाच्या तिरंग्याच्या सन्मानासाठी, उत्तुंग धैर्य आणि अभिमान याव्दारे क्रांतिकारकांचे बलीदान विसरता येणे कदापि शक्य नाही. प्रत्येक भारतीयांच्या हृदयात देशभक्ति जागृत करणे, राष्ट्रध्वजा बद्दल जागरूकता वाढविणे हाच ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे,’ असे प्रतिपादन बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी श्री संभाजीराजे विद्या संकुलात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने केले.

जातेगांव बु॥ (ता. शिरूर) येथील श्री संभाजीराजे विद्या संकुलात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियानास सुरुवात प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जातेगाव बुद्रुकचे सरपंच किशोर खळदकर, उपसरपंच गणेश उमाप, केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, प्राचार्य रामदास थिटे, सामाजीक कार्यकर्ते अप्पासाहेब मोरे व विद्यालयीन शिक्षक वृंद उपस्थित होते.

दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट नुसार संपन्न होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाविषयी प्रास्ताविकात प्राचार्य रामदास थिटे म्हणाले, ‘भारत सरकार व्दारा देश व तिरंगा ध्वज याच्या सन्मानासाठी गावातील प्रत्येक घरावर तिरंगा उपक्रम म्हणजे अभिमान, सन्मान धैर्य आणि प्रेरणेचे प्रतिक आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना महात्मा गांधीच्या साबरमती आश्रमापासून ७५ आठवड्यांसाठी, देशातील ७५ ठिकाणी स्वातंत्र्य लढयातील ७५ महत्वाच्या घटनांची आठवण यानिमित्ताने केली जात आहे.’

यानिमित्ताने विद्यालयीन विद्यार्थ्यानी तिरंगा ध्वज, अमृतमहोत्सव घोषणा, प्रभातफेरी, पोस्टर प्रदर्शन, विविध स्पर्धा, गाव व विद्यालयीन स्वच्छता, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रमाचे आयोजन करणेकामी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत.