पिंपळे जगतापच्या उपसरपंचपदी कुणाल बेंडभरच कायम

शिरूर तालुका

सरपंच ग्रामसेवक यांनी घेतलेली उपसरपंच पदाची निवड अवैध

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाचा अनेक दिवसांपासून सुरु असलेला पेच आता सुटला असून उपसरपंच पदी कुणाल बेंडभर हे कायम असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच कुणाल बेंडभर यांची अतिक्रमण केलेले असल्याने त्यांचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य पद अपात्र ठरवण्यात यावे याबाबतची मागणी आबासाहेब तांबे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली असताना १ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांनी कुणाल बेंडभर यांना पदावरुन अपात्र ठरवले होते.

दरम्यान कुणाल बेंडभर यांनी १५ डिसेंबर २०२१ रोजी विभागीय आयुक्तांकडे दाद मागत त्यांचे अतिक्रमण नसून सदर अतिक्रमणचा ते उपभोग घेत नसल्याने त्यांना पदावर कायम ठेवत उपसरपंच पद भोगण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी केली असता विभागीय आयुक्तांनी १४ मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती दिली.

दरम्यान पिंपळे जगतापच्या सरपंच सोनल नाईकनवरे व ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे यांनी २८ मार्च २०२२ रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेत उपसरपंच पदी शुभांगी शेळके यांची वर्णी लागली तर उपसरपंच कुणाल बेंडभर यांनी ११ एप्रिल २०२२ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या स्तगीतीचे आधारे उपसरपंच पदाची घेण्यात आलेली निवडणूक बेकायदेशीर असल्याबाबत पत्र दिले होते.

नुकतेच जिल्हाधिकारी यांनी पिंपळे जगताप ग्रामपंचायतची उपसरपंच पदाची घेण्यात आलेली निवडणूक बेकायदेशीर ठरवत कुणाल बेंडभर यांना ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच पदावर कायम ठेवत शुभांगी शेळके यांनी उपसरपंच पदाची निवड रद्द केली असल्याने आता कुणाल बेंडभर यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.