मराठा महासंघाच्या वतीने अनोख्या पद्धतीने नागपंचमी सण साजरा

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): अखिल भारतीय मराठा महासंघ व रामलिंग महिला उन्नती संस्थेने नागपंचमीच्या प्रथेला फाटा देत वारुळात दूध सोडण्याऐवजी गरजू चिमुकल्यांना दूध वाटप केले एवढेच नव्हे तर विधवांना सुवासिनींचा मान देऊन अनोख्या पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा केला.

नागपंचमीला सुवासिनीच्या हस्ते नागदेवतेची पूजा करुन नागाला दूध म्हणून या दिवशी शेकडो लिटर दूध वारुळांमध्ये सोडले जाते. अखिल भारतीय मराठा महासंघ व रामलिंग महिला उन्नती संस्थेने मात्र या प्रथेला फाटा देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षापासून या संस्था प्रथेप्रमाणे नागपंचमी साजरी करण्याऐवजी गरजू चिमुकले व विधवांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नागपंचमीला नटून थटून सुवासिनी पूजेचे ताट घेऊन वारुळाकडे जाताना दिसतात. नागाजी प्रतीकात्मक पूजा करुन या सुवासिनी नागाला दूध पाजायचे म्हणून वारुळामध्ये दूध सोडतात. वास्तविक पाहता या प्रथेमुळे शेकडो लीटर दुधाचा अपव्यय होताना आपण पाहतो. प्रथे परंपरेनुसार नागाची प्रतीकात्मक पूजा करणे ठीक आहे. मात्र वारुळात दूध सोडणे कितपत योग्य आहे. सवाल या संस्था करतात. समाजात आजही अशी अनेक कुटुंब आहेत की ज्या कुटुंबातील मुलांना घोटभर दूधही मिळत नाही. वारुळात दूध सोडण्याऐवजी अशा मुलांना जर नागपंचमीच्या दिवशी दूध वाटप केले तर खऱ्या अर्थाने हा सण साजरा होईल.अशी आमची धारणा असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला तालुकाध्यक्षा शशिकला काळे व रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी सांगितले.

नागपंचमी निमित्त रामलिंग येथील वस्तीमध्ये जाऊन मुलांना दूध वाटप केले. सामाजिक प्रथा परंपरेचा जोखडामुळे सण, उत्सवापासून कायम वंचित राहत असलेल्या विधवांनाही काळे व कर्डिले यांनी नागपंचमी सणाचा आनंद देताना साडी चोळी देऊन त्यांना सुवांसिनींचा मान दिला. पतीच्या निधनानंतर अनेक वर्ष अंधकारमय जीवन व्यतीत करणाऱ्या विधवांना सुवासिनींप्रमाणे मान मिळाल्याने त्यांनाही अश्रू अनावर झाले. विधवा होणे हा महिलांचा दोष नाही. तुम्हालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, असे सांगत राणी कर्डिले यांनी या महिलांचे सांत्वन केले .

यावेळी शिरुर ग्रामीणचे आदर्श सरपंच नामदेव जाधव, सदस्य रमेश चव्हाण, हिरामण जाधव, राष्ट्रवादी लीगल सेल अध्यक्ष- रवींद्र खांडरे, नामदेव चाबुकस्वार, निचीत सर, युवा नेते शरद पवार, जिल्हा परिषद सदस्या कोमल वाखारे, नगरसेविका मनीषा कालेवार, वकील सीमा काशीकर, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्याध्यक्ष मीना गवारे, ताराबाई चाबुकस्वार, शर्मिला निचित, गायत्री डिंगरे, लता नाझिरकर, छाया हारदे, प्रिया बिरादार, अनिता शिंदे, राणी शिंदे, इ मान्यवर उपस्थित होते. सर्वांचे आभार संस्थेच्या वतीने राणी कर्डिले यांनी मानले.