शिरुर तालुक्यातील म्हसे येथे जेष्ठ महिलेवर बिबटयाचा हल्ला, महिला थोडक्यात बचावली…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील म्हसे येथे एका बिबट्याने तुळसाबाई गंगाराम मुसळे या महीलेवर जीवघेणा हल्ला केला आहे. लघू शंकेसाठी (दि. १९ ) रोजी सांयकाळी ७ च्या सुमाराम घराबाहेर आलेल्या या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने बाजरीच्या शेतातून येत पाठीमागून हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या पाठीवर, डोक्यात गंभीर जखमा झाल्या आहे. सदर महिलेला तात्काळ शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.

बेट भागातील जांबुत, पिंपरखेड या भागात बिबटयाच्या हल्ल्यात आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असुन अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. त्यात पुन्हा म्हसे येथे एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने नागरीक भितीच्या छायेखाली जीवन जगत आहे. तसेच हल्ला झाल्यावरच पिंजरा लावला जात आहे. वनविभाग हलगर्जीपणा करत असून परीसरात जनजागृती करत नाही असा तक्रारीचा सुर नागरीकांमधून उमटत आहे.

गेली दोन वर्षापासून या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. अनेकदा पशुधनासह चार जणांना आपला जीव गमवावा लागला असुन बिबट्याच्या वाढत्या मुक्त संचारामुळे शेतमजुरांसह नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून याबाबत पिंजऱ्यांची संख्या वाढवून बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.