टाकळी हाजी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या गैरहजेरीविरोधात नऊ गावांचा संताप

शिरूर तालुका

६ ऑक्टोबरपासून उपोषणाची हाक; जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेवर ग्रामस्थांचा रोष

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील आरोग्य केंद्रावर नियुक्त वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी निवासी राहत नसल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नऊ गावांतील ग्रामस्थांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वारंवार जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या. माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, आमदार रोहित पवार आणि जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी देखील थेट आरोग्यमंत्री यांना पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली. मात्र, प्रशासनाने सर्व पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवत कारवाई टाळली आहे.

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चौकशी कमिटी गावात दाखल झाली असली तरी कमिटीने फक्त आपल्या मर्जीतील लोकांचे म्हणणे नोंदवून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला “चांगले काम करत आहेत” असा खोटा अहवाल तयार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “कमिटीने खाल्लेल्या मिठाला जागून वैद्यकीय अधिकाऱ्याला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला,” असा रोष फाकटे येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

ग्रामस्थांचा थेट आरोप आहे की, “वैद्यकीय अधिकारी स्वतःच गावकऱ्यांना सांगतात की, माझे वडील मोठे अधिकारी आहेत; माझी बदली कोणी करू शकत नाही.” यावरून संबंधित अधिकाऱ्याच्या बड्या ‘कलेक्टर बापाच्या’ वरदहस्तामुळेच ही संगनमताची चौकशी व कारवाई टाळली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे नऊ गावातील ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला असून आता ६ ऑक्टोबरपासून टाकळी हाजी आरोग्य केंद्रासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सरपंच अरुणाताई घोडे यांनी दिला आहे.

निवासी न राहणाऱ्या दोषी वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ बदली करून योग्य ती कारवाई न झाल्यास नऊ गावातील ग्रामस्थ ६ ऑक्टोबरपासून टाकळी हाजी आरोग्य केंद्रासमोर उपोषणास बसतील.”

अरुणाताई घोडे, सरपंच टाकळी हाजी