शिरुर (तेजस फडके) पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा झाली. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने चारचाकी पिक चालवित एक जणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
शुक्रवार (दि ९) ऑगस्ट रोजी मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे एक पंधरा वर्षीय शाळकरी मुलगी शाळेतुन घरी येताना टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने तिचाही जागीच मृत्यू झाला. शिरुर तालुक्यात अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात सध्या दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या देत असल्याचे चित्र असुन शिरुर शहर तसेच ग्रामीण भागात अल्पवयीन मुलांच्या हातात ट्रॅक्टर, मालवाहू चारचाकी गाड्या सर्रास दिसुन येत आहेत.
हि अल्पवयीन मुले वेगात बेदाकारपणे गाड्या पळवत आहेत. त्यामुळेच शिरुर तालुक्यात दोन गंभीर अपघातात एका अल्पवयीन मुलीकडुन एका दुचाकीस्वाराचा बळी गेला. तर दुसऱ्या अपघातात दुचाकी चालविणाऱ्या मुलीचा टेम्पोला धडक बसल्याने मृत्यू झाला. याला सर्वस्वी पालकच जबाबदार आहेत अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे. पालकांच्या बेजबाबदारपणा मुळे कोणाचा तरी जीव जातोय याचं भान पालकांना असणं गरजेचं आहे.
पुण्यातील हिट अँड रण प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुरुवातीला जामिनावर सुटका झाली होती. परंतु नंतर सोशल मिडीयावर नेटीझन्सने हे प्रकरण उचलुन धरल्यावर मात्र त्या मुलासह त्याच्या वडिलांवर कडक कारवाई करण्यात आली. शिरुर तालुक्यातही पालकांनीही अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देताना काळजी घेणे गरजेचे आहे.
अल्पवयीन मुलांच्या हातात गाड्या हव्यात कशाला…?
शिरुर शहरात अनेक ठिकाणी क्लासेस आहेत. या क्लासला येताना शाळेतील तसेच कॉलेजमधील अल्पवयीन मुलांना पालक दुचाकी देतात. शिरुरच्या गल्ली बोळातुन क्लासला येताना जाताना एका दुचाकीवर तीन तीन जण बसुन वेगात हि अल्पवयीन मुले-मुली गाडी चालवत असतात. त्यामुळे अनेकवेळा किरकोळ अपघातातही होतात. पालक आपली जबाबदारी टाळत अल्पवयीन मुलांच्या हातात गाड्या देतात. परंतु त्यामुळेच अनेकवेळा अपघातासारखे अनुचित प्रकार घडतात.
पोलिसांनी कडक उपायोजना करणे गरजेचे…
शिरुर शहर तसेच ग्रामीण भागात अनेक अल्पवयीन मुलांच्या हातात पालक सर्रास दुचाकी आणि चारचाकी गाड्या देत असुन पोलिस याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. मांडवगण फराटा येथील माध्यमिक शाळेसमोरच हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन आहे. परंतु या शाळेत अनेक अल्पवयीन विद्यार्थी सर्रास दुचाकी घेऊन येत असतात. हि गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास येत नाही का…? कि पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत असुन जर वेळीच पोलिसांनी कडक कारवाई केली असती. तर कदाचित श्रावणी थोरात या विद्यार्थिनीचा बळीगेला नसता.
राजकीय पुढाऱ्यांनी पोलिस स्टेशन मधील हस्तक्षेप थांबवावा…?
शिरुर तालुक्यात पोलिसांच्या कारवाईत अनेकवेळा राजकीय पुढारी हस्तक्षेप करतात. शिक्रापुर, रांजणगाव एम आय डी सी आणि शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत अनेकवेळा तालुक्यातील राजकीय पुढारी आणि त्यांचे बगलबच्चे यांच्याच अल्पवयीन मुलांच्या हातात महागड्या दुचाकी व चारचाकी गाड्या दिसुन येतात. परंतु पोलिस नियमानुसार कारवाई करायला गेल्यास राजकीय पुढारी आणि त्यांचे बगलबच्चे आपल्या नेत्यांना फोन करुन पोलिसांवर दबाव आणतात. त्यामुळे पोलिसांचाही नाईलाज होतो. त्यामुळे राजकीय पुढारी आणि त्यांचे बगलबच्चे यांची पोलिसांच्या कोणत्याही कारवाईत विनाकारण होणारी लुडबुड थांबविण्याची मागणीही सर्वसामान्य जनतेने केली आहे.
मांडवगण फराटा येथे टेम्पो व दुचाकीच्या धडकेत पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या