मांडवगण फराटा (संपत कारकुड) शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील मांडवगण फराटा गावापासुन दिड किमी अंतरावर असलेल्या कोळपेवस्ती येथे मालवाहतूक करणारा टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत नववीत शिकणाऱ्या श्रावणी देविदास थोरात (वय १५) हिचा जागीच मृत्यू झाला आहे. आज (दि ९) रोजी शाळा सुटल्यानंतर ४:३० ते ४:४५ दरम्यान घरी जाताना भरधाव टेंपोने या शाळकरी मुलीचा बळी घेतला आहे. तिच्या पाठीमागे बसलेला तिचा भाऊ थोडक्यात बचावला आहे.
याबाबत मांडवगण फराटा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास नानासो थोरात यांच्या फिर्यादीवरून श्रावणी देविदास थोरात (वय १५) इयत्ता नववी आणि तिचा भाऊ निरंजन देविदास थोरात (वय १३) इयत्ता सातवी हे दोघे वाघेश्वर विद्याधाम प्रशालेत शिकत होते. सायंकाळीं सव्वा चार वाजता शाळा सुटल्यानंतर ते दोघेही दुचाकी क्रं एम एच १२ ई जी ५१७४ वरुन घरी जात असताना कोळपेवस्ती येथे समोरुन येणारा भरधाव टेम्पो एम एच ४२ बी पी ३१३२ या टेम्पोने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.
हि धडक इतकी जोरदार होती की टेम्पो चालकाने दोन्हीही मुलांना पन्नास फुट फरफटत नेले. यावेळी श्रावणी हिला गंभीर दुखापत झाल्याने जागेवरच मृत्यू झाला. तसेच भाऊ निरंजन यास गंभीर जखमी अवस्थेत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक मुलांना मदत न करताच पळून गेला. श्रावणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी न्हावरा येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शाळकरी मुलांच्या हातात वाहन देणे ठरतेय धोकादायक…
पालकांनी शाळकरी मुलांना वाहन चालवण्यासाठी देऊ नये अशा सुचना वाहतुक पोलिसांनी वारंवार सांगितले होते. तसेच विद्यालयातील शिक्षकांनी तसेच पोलिसांनी सांगुनही अनेक विद्यार्थी मोटरसायकलवरच शाळेत येतात. ग्रामीण भागात अजुनही पालक दुचाकी गाड्या अल्पवयीन मुलांच्या हातात देतात. त्यामुळे असे अनुचित प्रकार होतात. यात चुक कोणाची यापेक्षा मुलांच्या हातात वाहने देऊ नयेत असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास शिरुर पोलीस करत आहेत.
शिरुर येथील बहुचर्चित बीओटी प्रकल्पातील ठेकेदाराकडुन महीलेची फसवणुक; मुख्यमंत्र्याकडे केली तक्रार
रामलिंग येथे नागपंचमी निमित्त वंचित घटकातील लहान मुलांना दुध व पुरण पोळीचे जेवण
शिरुर; सासऱ्याचा सुनेबरोबर झाला वाद अन सुनेच्या दोन भावांनी व बहिणीने सासर्याला केले ठार