महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीच्या विरोधात २८ ऑगस्टला पुणे-नगर महामार्ग अडवुन रास्ता रोको आंदोलन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतील विषारी केमिकलचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडून देत असल्यामुळे निमगाव भोगी, आण्णापुर, रामलिंग, कर्डीलवाडी, सरदवाडी, कारेगाव, शिरुर-ग्रामीण, ढोकसांगवी या गावातील ओढे-नाले, विहिरी, बोअरवेलचे पाणी पुर्णपणे दुषित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) हि कंपनी कायमस्वरुपी बंद करण्यात यावी याविरोधात २८ ऑगस्ट २०२४ रोजी पुणे-नगर महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) या कंपनीतुन केमिकलचे फेसाळयुक्त काळे पाणी आसपासच्या परिसरातील ओढया-नाल्यांमधुन वाहत येत आहे. ओढ्याला काळ्या व लाल रंगाचे पाणी, तसेच ओढ्याच्या बंधाऱ्यावरुन पडणारे पाणी आपटल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या फेसाचे ढिग तयार होतात. हे दुषित पाणी जमिनीत मुरत असुन तेच पाणी झिपरुन विहीरीत जात आहे. तसेच नाईलाजास्तव तेच पाणी पिण्यासाठी वापरात येत असल्याने या परीसरातील हजारो नागरीकांना कर्करोग, कॅन्सर, त्वचारोग यांना बळी पडावे लागत असुन या भागात असंख्य रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असल्याचे रामलिंगचे माजी सरपंच विठ्ठल घावटे, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, कारेगावचे ग्रामपंचायत सदस्य तेजस फलके, शरद नवले यांनी सांगितले.

 

MEPL कंपनी चुकीच्या ठिकाणी…?

सदर कंपनी ही केमिकल झोन व बिगर रहिवासी झोन (निमर्नुष्य) परिसरात घेण्याऐवजी बेकायदेशीररित्या या परिसरात अनधिकृतपणे चालु आहे असे येथील नागरीकांचे म्हणणे आहे. कंपनीने हे दुषित पाणी सोडल्याने परीसरातील शेतातील विहीरी या काळ्या पाण्यामुळे दुषित झाल्या आहेत. ते पाणी शेतीला वापरल्यामुळे भाजीपाला व अन्नधान्य खाण्यायोग्य राहिले नाही. तसेच औद्योगिक वसाहती शेजारील कारेगाव, ढोकसांगवी, सरदवाडी ,कर्डीलवाडी गावात पिकणारा भाजीपाला लोकांनी खाण्याचे बंद केले आहेत.

 

लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढतेय…?

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे रामलिंग ग्रामपंचायत हद्दीतील महाजनमळा, लोंढेमळा आणि बोऱ्हाडेमळा या वसाहती ओढ्यालगतच आहेत. बोऱ्हाडेमळा व लोंढेमळा येथे अचानक आजार व मृत्यूचे प्रमाण वाढले असुन गेल्या पाच दिवसापूर्वी लोंढेमळा येथील ९ वर्षाची इयत्ता ४ थी मध्ये शिकणारी मुलगी कु स्वरांजली निलेश लोंढे या मुलीला स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम चालु असतानाच रक्ताच्या उलट्या झाल्या. तिला ब्लड कॅन्सरचे निदान झालेले असून मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे तिच्यावर सध्या उपचार चालु आहेत.

 

घोड धरणाला भविष्यात दुषित पाण्याचा धोका…?

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) या कंपनीतुन निघणारे केमिकलचे फेसाळयुक्त दुषित काळे पाणी निमगाव भोगी, आण्णापुर, रामलिंग, कर्डीलवाडी, सरदवाडी, कारेगाव, शिरुर-ग्रामीण, ढोकसांगवी या गावातील ओढयानाल्यां मधुन हे दुषित पाणी शिरुर येथे घोड नदीमध्ये सोडले जात असुन पुढे ते चिंचणी येथील घोड जलाशयात जात असुन चिंचणी येथील घोड धरणातील पाणीही यामुळे दुषित झाले आहे. त्याचा फटका शिरुर आणि श्रीगोंदा या तालुक्यांना बसला आहे.

 

शेती व पिण्याचे पाणीही प्रदुषित… 

घोड धरणातील हे पाणी पुन्हा शिंदोडी येथुन जलवाहिनीद्वारे रांजणगाव औद्योगिक वसाहतीत आणले जात असुन हेच दुषित पाणी पुन्हा पिण्यासाठी वापरात येत असल्यामुळे परीसरातील नागरिकांना अनेक आजार जडले असल्याने रांजणगाव औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीच्या केमिकल युक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची वाट लागलेली असुन आता या सर्व गावातील नागरिकांनी एकत्र येऊन या कंपनी विरोधात एल्गार पुकारला आहे. येत्या २८ऑगस्ट २०२४ रोजी ते पुणे-नगर महामार्ग अडवून रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

रांजणगाव येथील जल प्रदुषण करणाऱ्या MEPL कंपनीवर बंदी आणा खासदार डॉ अमोल कोल्हे यांची लोकसभेत मागणी

MEPL कंपनीबाबत येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडावा शेखर पाचुंदकर यांची दिलीप वळसेंकडे मागणी

रांजणगाव MIDC तील MEPL कंपनीच्या दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांची उद्योगमंत्र्याकडे धाव

घोड धरणातील वाळू चोरीबाबत महसुल विभागाच वरातीमागुन घोड शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल

चिंचणी येथील वाळूमाफीयांविरोधात जोरदार कारवाई करणार; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के