रांजणगाव MIDC तील MEPL कंपनीच्या दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांची उद्योगमंत्र्याकडे धाव

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हायरो पावर लिमिटेड या कंपनीच्या दुषित पाण्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निमगाव भोगी येथील शेतकऱ्यांची जमीन नापिक होत असुन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

तसेच येथील ओढे, नाले, विहिरी बोअरवेल यातील सगळेच पाणी दुषित झाल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरातील गावांना देखील याचा हळूहळू याचा धोका जाणवत असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. त्यानंतर सामंत यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत या बाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रांजणगाव MIDC मध्ये असणाऱ्या MEPL कंपनीमुळे निमगाव भोगी, अण्णापुर, कर्डीलवाडी, कारेगाव, शिरुर ग्रामीण, शिरुर शहर, सरदवाडी येथील ओढ्या-नाल्यातुन हे पाणी थेट घोडनदीत मिसळत असल्याने तर्डोबाचीवाडी येथील घोड धरणातही दूषित पाणी आढळून येत असल्याने स्थानिक गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेकवेळा स्थानिक नागरिकांनी MEPL कंपनीच्या विरोधात आंदोलनेही केलेली आहेत.

निमगाव भोगी येथील ग्रामस्थांनी काही वर्षांपुर्वी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे याबाबत गाऱ्हाणे मांडले होते. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर आढळराव पाटील यांनी तातडीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे याबाबत पाठपुरावा चालु केला होता. त्यानंतर दोनच दिवसापुर्वी बाधित गावातील अनेक शेतकऱ्यांना सोबत घेऊन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्योगमंत्री सामंत यांची भेट घेतली. यावेळी MEPL च्या दूषित पाणी प्रश्नाबाबत सामंत यांनी सर्व ग्रामस्थांसमोरच अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आणि कंपनीतुन बाहेर सोडण्यात येणाऱ्या दुषित पाण्याबाबत तात्काळ कारवाई करण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद, मछिंद्र कदम, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, विष्णु वाळके, जिल्हा सरचिटणीस वैभव ढोकले, शरद नवले, कारेगावचे ग्रामपंचायत सदस्य तेजस फलके, सोमनाथ नवले, तसेच कारेगाव, ढोकसांगवी येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.