शिरुर तालुक्यातील महिला स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात करणार आत्मदहन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर येथे राहणाऱ्या एका महिलेची दौंड तालुक्यातील पेशाने वकिल असणाऱ्या व्यक्ती सोबत इंस्टाग्राम वर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्याच मैत्रीचा फायदा घेत या वकील महाशयांनी त्या महिलेच्या घरी जाणे-येणे सुरु ठेवले. त्यानंतर तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचे अश्लील फोटो काढत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल असुन 12 दिवस उलटूनही पोलिस आरोपी अ‍ॅड राहुल संभाजी झगडे (रा. कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) याला अटक करत नसल्याने संबंधित पिडीत महिला 15 ऑगस्ट रोजी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या पाच वर्षाच्या मुलासह आत्मदहन करणार आहे.

याबाबत पिडीत महिलेने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल, शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के या सर्वांना निवेदन पाठवले असुन या निवेदनात शिक्रापुर पोलिस आरोपीला मदत करत असल्याचा गंभीर आरोप केला असुन शिक्रापुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेतला आहे.

सदर पिडीत महिलेने निवेदनात दिलेली हकीकत पुढीलप्रमाणे आरोपी अ‍ॅड राहुल झगडे याची आणि पिडीत महिलेची इंस्टाग्राम वर ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. त्यानंतर पिडीत महिलेच्या वाढदिवसाच्या दिवशी आरोपी राहुल हा केक घेऊन तिच्या घरी आला. त्यावेळी ती नको म्हणत असताना तिला केक भरवला त्यानंतर तिला गुंगी आल्याने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार करत तिचे अश्लील फोटो काढले. तसेच हे फोटो तिच्या नवऱ्याला दाखविन्याची धमकी देत वेळोवेळी पुणे, जेजुरी, गोवा, अक्कलकोट अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याने पिडीत महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

हा प्रकार काही दिवसांनी पिडीत महिलेच्या नवऱ्याच्या लक्षात आल्यानंतर राहुल झगडे याने तु नवऱ्याला घटस्फोट दे असं म्हणतं तिला लग्नाचे आमिष दाखवले. या सर्व प्रकारानंतर तिने राहुलकडे लग्नाचा तगादा लावला. परंतु राहुल याने घाईघाईत दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केले. त्यानंतर पिडीत महिलेने आपल्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करु नये. यासाठी राहुल याने पिडीत महिला आणि तिच्या नवऱ्यावर शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल केला. या सर्व प्रकारामुळे पिडीत महिलेने आरोपी राहुल झगडे याच्या विरोधात शिक्रापुर पोलिस स्टेशनला फिर्याद देत बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

परंतु 12 दिवस उलटूनही शिक्रापुर पोलिसांनी आरोपी राहुल संभाजी झगडे याला पोलिसांनी अटक केली नसुन तपास अधिकारी महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या तपासात दिरंगाई करत असल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. याबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर महिलेने दाखल केलेला बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास चालु असुन तो गुन्हा टेक्निकल स्वरुपाचा आहे. तसेच सदर महिले विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे.

(क्रमश:)