शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दुचाक्या वाहनांसह आदी चोऱ्यांच्या घटना वारंवार घडत असताना आता चक्क शालेय मुलांच्या ३६२ कपड्यांसह कारची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे प्रकाश घोलप यांचे स्पोर्ट क्लबचे दुकान असून ते शालेय मुलांना देखील कपडे पुरवितात. शिक्रापूर परिसरातील एका शाळेच्या मुलांसाठी कपडे शिऊन शिवलेले शर्ट, प्यांट, टी शर्ट असे तब्बल ३६२ कपडे त्यांच्या एम एच १२ एस यु १३५६ या कार मध्ये ठेवून १९ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास कार घराच्या समोर लावली होती. सकाळच्या सुमारास घोलप उठले असता त्यांना घरासमोर कार दिसली नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता कार कोठेही मिळून आली नाही.

याबाबत प्रकाश बाबासाहेब घोलप (वय ४३ वर्षे रा. करंजेनगर २ शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बापू हडागळे हे करत आहेत.