केंदूर परिसरातील वेळनदीला पुर आल्याने पुल पाण्याखाली

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीला अनेक वर्षानंतर पूर आलेला असल्याने येथील पूल पाण्याखाली गेला त्यामुळे परिसरातील वा वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटला असल्याने येथील पुलाची उंची वाढवण्याची मागणी परिसरातील नागरिक व ग्रामस्थ करत आहेत.

केंदूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीला पुर आल्याने केंदूर- धामारी व पऱ्हाडवाडी- मुखई या नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे. वेळनदी वरील थिटेवाडी बंधारा 100 टक्के भरलेला असल्याने सातगाव पठार परिसरात तसेच नदी भागात मुसळधार पाउस झाल्यास नदीला मोठा पुर येत आहे.

त्यामुळे या भागातील लहान पुल पाण्याखाली जात आहेत. या परिसरातील पुल पाण्याखाली गेल्याने या भागातील महादेवाडी, तवलीबेंद, माळीमळा, पऱ्हाडवाडी या वस्त्यांना प्रवासासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी गेली 2 ते 3 वर्षापासून वेळ नदीला इतक्या मोठ्या प्रमाणात पूर कधीच आलेला नव्हता.

मात्र बंधारा भरल्यामुळे मोठा पूर पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या परिसरातील पुलांची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड व उद्योजक प्रमोद पऱ्हाड यांनी सांगीतले.