सेवाधामच्या दिव्यांग मुलांनी रंगवला अनोखा पालखी सोहळा

शिरूर तालुका

विठ्ठल रुख्मिणीच्या वेशात विद्यार्थी पालखी सोहळ्यात सहभागी

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी पालखी खांद्यावर घेत, टाळ मृदुंग वाजवत, फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केल्याने सेवाधामच्या दिव्यांग मुलांचा पालखी सोहळा चांगलाच रंगल्याचे दिसून आले आहे.

unique international school
unique international school

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालखी सोहळ्यात प्रथम मुख्याध्यापक पवन कट्यारमल व अधिक्षिका भाग्यश्री चिलात्रे यांच्या हस्ते पालखीचे पुजन करण्यात आले. यावेळी सर्व विशेष विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेषात उपस्थित राहून टाळ व पताका घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला होता. यावेळी प्रज्वल चांदगुडे याने विठुरायाची तर रिध्देश बोंबले याने रुक्मिणीची वेषभूषा साकारली होती. पियुष शिवले याने विणेकरी भूमिका साकारली तर उत्कर्ष हरगुडे व ओम भोजने यांनी पोलीस गणवेश परिधान करून पालखी सोहळ्यातील पोलिसांच्या कर्तव्याची कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांसह कर्मचारी हरिनामाच्या गजरात रंगून गेले. त्यानंतर गोल रिंगण व उभे रिंगण सोहळा देखील विशेष मुलांनी अनुभवला. सदर पालखी सोहळ्यात काही ग्रामस्थ व पालक देखील सहभागी झाले होते. सदर अनोखा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक संजय पोटफोडे, सोनाली शिनगारे, वनिता बावनेर, शुभांगी पायमोडे अक्षय लोहकपुरे, श्रीकृष्ण हरगुडे, महादेव नाचण यांनी विशेष परिश्रम घेतले तर शुभांगी पायमोडे यांनी सर्वांचे आभार मानले.