लाचखोरी, झिरो कर्मचाऱ्यांचा गैरवापर आणि लोकांची पिळवणूक सुरूच!
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक अधिकारी सध्या चर्चेचा विषय ठरत असून, त्यांच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे. या अधिकाऱ्याचे अनेक कारनामे एकामागून एक उघडकीस येत असून, अजूनही संबंधित अधिकारी मुजोरीपणाने वागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कार्यालयात दिवसेंदिवस सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. संबंधित उपअधीक्षक कार्यालयात एसी लावून दरवाजा बंद करून बसत असल्यामुळे नागरिकांना तासन्तास उभे राहून वाट पाहावी लागते. “दरवाजा उघडा ठेवून काम करता येत नाही का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
तसेच, कार्यालयात कोणतीही नियुक्ती नसलेल्या तथाकथित ‘झिरो’ कर्मचाऱ्यांची वर्दळ सुरुच असून, ते खुलेआम कागदपत्रे हाताळत आहेत. या झिरो कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच नागरिकांकडून आर्थिक लाच घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या बाबत अनेक तक्रारी असूनही आजतागायत कुठलीही ठोस कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.
हेच उपअधीक्षक अधिकारी यापूर्वी सोलापूर येथे कार्यरत असताना, लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले होते. आता शिरूरमध्येही तेच डावपेच पुन्हा खेळले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे. त्यांनी कार्यालयातील झिरो कर्मचाऱ्यांचा वापर करून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारांनी आर्थिक अडचणीत टाकल्याची उदाहरणे वाढत आहेत.
या प्रकारांना कंटाळून अनेक शेतकरी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. “जर वेळेत योग्य कारवाई झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा देण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा, प्रशासनाविरोधात जनआंदोलन उभारले जाईल, हे निश्चित!