बुरुंजवाडी गावचा शिक्रापूर पोलीस स्टेशनला समावेश

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या बुरुंजवाडी गावचा समावेश गावापासून जवळच असलेल्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करण्याची ग्रामस्थांची मागणी होत असताना नुकतेच बुरुंजवाडी गावचा शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत समावेश करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या बुरुंजवाडी गावचा समावेश रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन स्थापन झाल्यानंतर रांजणगावकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र बुरुंजवाडी ते रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशनचे अंतर हे 15 किलो मीटरहून अधिक असल्याने गावचा समावेश पुन्हा शिक्रापूर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्याची मागणी सरपंच नाना रुके, डॉ. रवींद्र टेमगिरे यांसह आदींनी कागदपत्रांची पूर्तता करत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांच्या माध्यमातून यापूर्वीचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे बुरुंजवाडी गावचा समावेश शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करण्याची मागणी केली.

दरम्यान सर्व कागदपत्रे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून गृहमंत्रालय मुंबई येथे दिली असता गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतचे आदेश दिलेले असताना नुकताच बुरुंजवाडी गावचा समावेश शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करण्यात आला.

याबाबत बोलताना राजकीय स्वार्थापोटी 3 किलो मीटरवर पोलीस स्टेशन असताना देखील रांजणगावच्या हद्दीत गाव देण्यात आलेले असताना यापूर्वी ग्रामस्थांनी तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले असताना आता आमच्या मागणीनुसार बुरुंजवाडीचा समावेश शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आल्याने नागरिकांची कामे सोयीस्कर होणार असल्याचे सरपंच नाना रुके यांनी सांगितले.