रांजणगाव पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम; पुरस्थितीत नदी-नाले पार करत आरोपीला पकडले

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिसांच्या एका धाडसी मोहिमेत अपहरण झालेली एक एक अल्पवयीन मुलगी सुखरुप सापडली असुन मुख्य आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण कारवाईत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या महिला हवालदार विद्या बनकर यांनी दाखवलेली चिकाटी आणि धाडस विशेष कौतुकास्पद ठरले आहे.

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे नोव्हेंबर २०२४ मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास गेल्या अनेक महिन्यापासुन महिला हवालदार विद्या बनकर या आरोपीबाबत सतत पाठपुरावा करत होत्या. काही दिवसांपुर्वी बनकर यांना आरोपी संतोष मुळे हा परभणी जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर तातडीने विद्या बनकर यांनी परभणीत पुरस्थिती असतानाही पोलिस हवालदार वैभव मोरे यांच्यासह धोका पत्करुन नदी-नाले पार करत आरोपीच्या मागावर धाड टाकली आणि थरारक पाठलागानंतर आरोपी संतोष बालाजी मुळे (रा. खोरस, ता. पालम, जि. परभणी) याला शिताफीने ताब्यात घेण्यात या दोघांनाही यश आले.

परंतु तपासा दरम्यान आरोपी गुन्हा कबुल करण्यास तयार नव्हता. मात्र उमेश कुतवळ यांच्या तांत्रिक तपासामुळे व पोलिसांच्या चिकाटीमुळे आरोपी व त्याचे नातेवाईक बोलते झाले आणि संतोष मुळे याने शेवटी गुन्ह्याची कबुली दिली आणि सदर अपहरण केलेली अल्पवयीन मुलगी लातुर येथे असल्याची पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर रात्री उशिरा आरोपीला परभणीतुन ताब्यात घेऊन पहाटे लातूर येथे आणण्यात आले. यावेळी अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी सुरक्षितरीत्या शोधण्यात पोलिसांना यश आले. या धाडसी मोहिमेबद्दल रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी महिला पोलिस हवालदार विद्या बनकर, पोलिस हवालदार वैभव मोरे आणि पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांचे अभिनंदन केले.

तसेच पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनीही त्यांचे अभिनंदन केले. सदर गुन्ह्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचाराचे कलमांची वाढ करण्यात आलेली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.