शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील वाजेवाडी गावाच्या हद्दीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कला केंद्राला ग्रामसभेत ठाम विरोध दर्शविण्यात आला असुन गुरुवार (दि. 21) रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी या कला केंद्राला परवानगी न देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.
ग्रामपंचायतीकडे आलेल्या परवानगी अर्जावर चर्चा करताना ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत गावात असे केंद्र होऊ नये, अशी भूमिका घेतली. यापूर्वी महिलांची स्वतंत्र सभा घेण्यात आली होती. त्यावेळी महिलांनीही केंद्राला विरोध करत रजिस्टर वरती 65 स्वाक्षरी करत विरोध नोंदविला होता.
ग्रामसभा ज्येष्ठ सदस्य यशोदा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असुन. यावेळी सरपंच, उपसरपंच अनुपस्थित असल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सभेत चैताली वाजे, औदुंबर भोंडवे, सुरेखा मांजरे, मंगल तिखे, रामदास मांजरे, संदीप भोर, ग्रामपंचायत अधिकारी मंगल लगड, (ढमढेरे)पोलीस पाटील सोनाली वाजे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दादा वाजे आदी ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते.
गावात अनेक पक्षांचे पदाधिकारी असून, सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचे दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात ग्रामसभेसारख्या महत्त्वाच्या बैठकीस या पुढाऱ्यांची अनुपस्थिती असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.