निओसीम इंडस्ट्रीज मध्ये वेतन वाढ करार संपन्न

शिरूर तालुका

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) औद्योगिक क्षेत्रातील निओसीम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात पाचवा वेतन वाढ करार शांततामय वातावरणात संपन्न झाला असून यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी १३ हजार ५०० रुपयाने वाढ करण्यात आली. या करारामुळे सध्या कामगारांचे वेतन हे ५० हजार रुपये इतके झाले आहे. कामगार हित जोपासत करार संपन्न केल्याबद्दल संघटनेचे राज्यअध्यक्ष माजी आमदार व माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांचा कामगार संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सणसवाडी (ता. शिरुर) औद्योगिक क्षेत्रातील निओसीम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील सदर करार संपन्न करण्यासाठी कामगार संघटनेच्या वतीने राज्य सरचिटणीस विठ्ठल गोळे, शिरुर तालुकाध्यक्ष विकास मासळकर, कामगार प्रतिनिधी हेमंत हरगुडे, हिरामण दरेकर, राहुल दरेकर, योगेश मेमाणे, निलेश दरेकर यांसह आदी प्रतिनिधींसह कंपनी व्यवस्थापनच्या वतीने व्हाईस प्रेसिडेंट स्वप्नील जठार यांच्या मार्फत वेतन वाढ करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कंपनीतील कामगारांची वेतनवाढ झाल्याने राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन च्या सर्व कामगारांनी एकमेकांनी पेढे भरवून आनंद साजरा केला.