शिरुर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तिन्ही पक्षाचे पदाधिकारी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा देणार का…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीची पीछेहाट झाल्यानंतर पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षसंघटनेच्या बांधणीसाठी मला उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळे करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पुर्व तयारीसाठी संपुर्ण राज्यात पुन्हा पक्षाच्या बळकटीसाठी काम करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

 

त्याचप्रमाणे शिरुर लोकसभा मतदार संघात झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आता स्वतःच्या नाकर्तेपणाबाबत आपापल्या पदांचा राजीनामा देणार का…? अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.

 

शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार वगळता डॉ अमोल कोल्हे यांच्यासोबत कोणताही बडा नेता नव्हता. परंतु शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठीमागे खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, भोसरी व हडपसर सहा विधानसभा मतदार संघातील बडे बडे नेते असतानाही त्यांचा पराभव झाल्याने “सारा गाव मामाचा अन एक बी नाय कामाचा” असे म्हणण्याची वेळ आढळराव पाटील यांच्यावर आली आहे.

 

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सलग तीन वेळा शिरुर लोकसभा मतदार संघाच नेतृत्व केले असुन गेले १५ वर्षे खासदार असल्यामुळे मतदार संघातल्या प्रत्येक गावात त्यांनी दौरा केलेला आहे. त्यामुळे मतदार संघातल्या सहा तालुक्यातील प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आढळराव यांचा परिचय होता. राज्यात राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर आढळराव पाटील यांनी आधी शिवसेना (शिंदे गट) आणि त्यानंतर शिरुर लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला.

 

शिरुरचा गड आमदार अशोक पवारांनी राखला…

परंतु लोकसभा निवडणुकीदरम्यान शिरुर तालुक्यात आमदार अशोक पवार वगळता डॉ अमोल कोल्हे यांच्यासोबत कोणताही मोठा राजकीय पुढारी नव्हता. परंतु आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडुन (अजित पवार गट) उमेदवारी घेतल्याने भाजपा, शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षाच्या मोठया मोठया नेत्यांनी अन कार्यकर्त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार केला. परंतु प्रचारादरम्यान करोडो रुपयांचा चुराडा होऊनही आढळराव पाटील यांचा डॉ कोल्हे यांनी प्रचंड मोठया मतांनी पराभव केला.

 

त्यामुळे शिरुर तालुक्यात एकीकडे सर्वसामान्य मतदार तर दुसरीकडे तिन्ही पक्षाचे बडे बडे नेते असुन सुद्धा मतदारांनी या निवडणुकीत गाव पुढाऱ्यांना पैसे घेऊनही ‘कात्रजचा घाट’ दाखविल्याची चर्चा गावागावातल्या पारावर रंगली आहे. तसेच शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), भाजपा, शिवसेना (शिंदे गट ) या तिन्ही पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या गावातच डॉ अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाले असल्यामुळे आढळराव यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाऊलावर पाऊल टाकत तिन्ही पक्षाचे पदाधिकारी राजीनामा देण्याची तयारी दर्शविणार का…? अशी सगळीकडे दबक्या आवाजात सुरु आहे.

शिरुरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन तालुकाध्यक्षाच्या गावातच डॉ. अमोल कोल्हे यांना आघाडी

महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी मतदारांनी दाखवून दिलं; ये ‘दादागिरी’ नही चलेगी, करारा ‘जबाव’ मिलेगा

शिरुर; सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षा ऐरणीवर अशोक भोरडे यांच्या जिवितास धोका पोहचवण्याचा कट…?