पोलिस तालुक्यातील गांजा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणार का…?

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर, रांजणगाव, शिक्रापुर पोलिस हद्दीतील अनेक गावांमध्ये गुप्तपणे मोठया प्रमाणावर गांजाची विक्री होत असुन पोलीस याकडे लक्ष देणार का…? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे. नुकतेच शिरुर तालुक्यातील ज्योती गव्हाणे व विश्वास गोरडे या दोन जणांना सीमा शुल्क विभागाने सोलापूर येथे ओडीसावरुन शिरुरला गांजा आणताना पकडले आहे. त्यांच्याकडून ५४ किलो वजनाचा १२ लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून हा गांजा शिरूर तालुक्यात कोणकोणत्या गावांमध्ये वितरीत होणार होता. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

रामलिंग येथे राहणाऱ्या एका गांजा विक्रेत्यावर पुणे शहर गुन्हे शाखा विभागाने मागील वर्षी धाड टाकली होती. मग शिरुर पोलिस काय करत होते…? तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ढोकसांगवी येथे मोठया प्रमाणात गांजा विक्री होत असल्याची नागरीक चर्चा करत आहे. काही महीन्यांपुर्वी रांजणगाव पोलिसांना एका बसमध्ये गांजा आढळून आला होता. ती कारवाई अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच शिक्रापुर परिसरात छोट्या छोट्या टपरी,दुकानात गांजाची किरकोळ विक्री सुरू आहे. एकुणच शिरुर तालुक्यात गांज्याची विक्री जोरदारपणे सुरू असून त्यांच्यावर कधी कारवाई होणार…? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.