शिक्रापुरात मोबाईल बाप्पा आले घरा नाटकातून अनोखा संदेश

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता.शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेत गणेश उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता मोबाईल बाप्पा आले घरा या नाटकाने मनोरंजन तर केलेच पण मोबाईलचे नवीन पिढीवर होणारे दुष्परिणाम फार प्रभावीपणे मांडण्यात आले असून सदर नाटकाच्या आशयाने आणि विद्यार्थ्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

शिक्रापूर (ता.शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोबाईलचे नवीन पिढीवर होणारे दुष्परिणाम याबाबतचे मोबाईल बाप्पा आले घरा या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. सदर नाटकाचे लेखन, दिग्दर्शन प्रशालेचे अध्यापक सुभाष कुरंदळे यांनी केले.

या नाटकात विनोदाच्या माध्यमातून मोबाईलच्या अति आहारी गेलेल्यांवर मार्मिकपणे भाष्य, चिडचिडेपणा, झोप न लागणे, एकटेपणा, सायबर क्राईमचा धोका, डोळ्यांच्या समस्या, कॅन्सर डिप्रेशन यांसह दुष्परिणाम तर सांगितलेच पण मोकळ्या वेळेत विद्यार्थ्यांनी वाचन, मैदानी खेळ या गोष्टींना वेळ देणे महत्त्वाचे असल्याचा संदेश दिला.

या नाटकात सिद्धी भिसे, वैष्णवी कोडे, सादिया देशमुख, नवनाथ गोसावी, अथर्व ढाकणे, आदित्य गडाख, आयुष शितोळे, संदेश बाजड, पार्थ शेंडे, तन्मय भांबरे या बालक कलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. तसेच नाटकाबरोबरच प्रशालेमध्ये रेकॉर्ड डान्स, पोवाडे ,लेझीम इत्यादी कार्यक्रम पार पडले, यावेळी मुख्याध्यापक सोनबापू गद्रे, उपमुख्याध्यापक सुनील थोरात, पर्यवेक्षक संजय शेळके, नानाभाऊ गावडे, सुनील दिवटे, गणेश मांढरे, रमेश जाधव, सुनील माने, चंद्रकांत देवीकर, श्रीकांत दळवी, सुरेश गंगावणे, जयश्री ढमढेरे, अंजली जगताप, अर्चना यादव, मंगल तारु, कल्पना तोडकर, जयश्री कोकाटे यांसह आदी अध्यापक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या या अनोख्या नाटकाच्या कलेबद्दल शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, सेक्रेटरी प्रकाश बोरा यांनी कौतुक केले. सदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंभा विराट यांनी केले, तर प्रास्ताविक ज्ञानेश्वर कुंभार यांनी केले आणि सुभाष कुरंदळे यांनी आभार मानले.