दसऱ्याच्या मुहर्तावर कापसाला पहिल्याच दिवशी मिळाला एवढा भाव…

इतर

सिल्लोड: बनकिन्होळा परिसरात दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस खरेदीला व्यापाऱ्यांकडून प्रारंभ करण्यात आला. व्यापारी संतोष फरकाडे व दत्ता काकडे यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर ११,००० रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

सिल्लोड प्रमाणेच पैठण तालुक्यातील टाकळी अंबड व परिसरात विविध ठिकाणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर टाकळी अंबड विक्रीसाठी आलेल्या कापसाला साधारणतः 7 हजार 700 ते 8 हजार दरम्यान प्रति क्विंटल भाव देण्यात आला. सुजल कृषी उद्योग वतीने पहिल्याच दिवशी 10 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मोठ्याप्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. मात्र यावर्षी सुरवाती पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात पाणी तुंबल्याने पिकांची वाढ खुटली आहे. तर काही ठिकाणी पिकं पिवळी पडली असल्याचे चित्र होते. त्यामुळे यंदा कापसाची आवक घटण्याची शक्यता आहे. आवक जर घटली तर निश्चीतच कापसाला भाव चांगला मिळू शकतो. मात्र भाव मिळाला तरी पिक घटल्याने शेवटी शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे.