ग्लोबल व्हिलेज संकल्पना मुलांमध्ये राबविण्याची आवश्यकता: मधुरा सावंत

इतर महाराष्ट्र

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने कासार्डे जांभूळवाडी येथे विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंग्रजी साहित्य क्षेत्रातील उदयोन्मुख लेखिका मधुरा सावंत ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी कासार्डे जांभूळवाडी शाळेचे विविध शालेय उपक्रम लक्षात घेऊन त्यांना लेझर प्रिंटर, डिजिटल तक्ते इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

संघटनेने आजपर्यंत कामगार चळवळ, कामगार कल्याण ह्या बरोबर सामाजिक बांधिलकीही जपली आहे. या संघटनेने कासार्डे जांभूळवाडी शाळेत विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या मधुरा सावंत यांनी शालेय विध्यार्थी व गावांतील प्रतिष्ठित नागरिक ह्यांच्या समोर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ग्लोबल व्हिलेजची संकल्पना मांडली. जगभर आता ही संकल्पना चर्चिली जात असताना त्याचे मूळ हे आपल्या देशात नव्हे तर आपल्या महाराष्ट्रात असल्याचे पटवून देताना त्यांनी सांगितले की, ‘भारतीय संस्कृती ही उच्च, उदात्त मूल्यावर आधारलेली आहे.

ओम सहनाववतु सहनौ भुनाक्तू ही वेदातील प्रार्थना व्यक्ती व व्यक्तिरेखा दाखवणारी आहे. आपण सारी एका परमेश्वराची लेकरे आहोत या विचारातून वसुदेव कुटुम्बकम ची कल्पना साकार केली आहे. संत ज्ञानेश्वरांची शिकवण हे विश्वची माझे घर या ओळीतून दिली आहे. ज्ञानेश्वरीसारख्या अनेक ग्रंथातून ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक परमेश्वराजवळ पसायदान मागितले. त्यांनी स्वतःसाठी काही न मागता भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे या शब्दात विश्वबंधुत्वाचे वरदान मागितले.

विश्वबंधुत्वाची भावना भारताला नवीन नाही. प्राचीन ग्रीक संस्कृतीत या भावनेची मुळे आहेत. आधुनिक कालखंडात फ्रेंच राज्यक्रांतीने बंधुत्वाचे तत्त्व ठाशीवपणे जन्माला आले. त्यावेळी या तत्वाला पहिल्यांदा राजकीय व सामाजिक चळवळीचा आधार मिळाला. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धानंतर इतर पाश्चात्त्य देशांमध्ये ही विश्वबंधुत्वाची कल्पना रुपास आली. यातूनच युनो आणि युनेस्को यासारख्या संतांचा जन्म झाला.

सर्व राष्ट्रांनी एकमेकांकडे एकच विश्व कुटुंबाचे घटक या नात्याने पाहण्याचा विचार पुढे आला. परस्परांबद्दल प्रेम भाव, संस्कृती, साहित्य, ज्ञान विकास त्याचे आदानप्रदान सुरू झाले. कोणत्या राष्ट्रात लावलेला शोध एका देशापुरते मर्यादित न राहता तो शोध व संशोधन साऱ्या जगाचे झाले.’

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्या हजारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप केला. त्यावेळी बोलताना मधुरा सावंत यांनी मुलांमधील वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रत्येक मुलाला आठवण म्हणून दिलेल्या गोष्टींच्या पुस्तकांचा आवर्जून उल्लेख करून मधुरा सावंत यांचे आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका श्रीम. मुंडले, तसेच ग्रामस्थ व समाजसेवक अतुल सावंत, सचिन वंजारे, नंदकिशोर सावंत, जयेश सावंत आदींनी प्रयत्न केले.