शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील पारोडी येथील सरकारी आरोग्य उपकेंद्र कायमच बंद अवस्थेत आढळून येत असून येथे डॉक्टर व कर्मचारी हजर नसल्याच्या धक्कादायक प्रकार वारंवार उघडकीस येत आहे. त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शासनाने आरोग्य उपकेंद्रावर करोडो रुपये खर्च करून दोन मजली इमारत बांधून सर्व सुख सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तरीही त्या ठिकाणी कर्तव्यास असलेले डॉक्टर व इतर कर्मचारी कामाची वेळ पाळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
तर आयुष्यमान भारत कसा होणार…?
सरकार सर्वांना योग्य उपचार मिळावा यासाठी आरोग्यावर भरमसाठ खर्च करत असताना दवाखान्यात नेमणूक असलेला एकही कर्मचारी तसेच अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही आणि कामाची वेळही पाळत नाही. त्यामुळे प्राथमिक उपचारापासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे आयुष्यमान भारत कसा होणार…? हा एक मोठा प्रश्न आहे.
रुग्णांच्या खिशाला बसते झळ…
सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी आल्यानंतर दवाखाना बंद असतो किंवा डॉक्टर उपस्थित नसतात. त्यामुळे परिणामी रुग्णांना उपचार घेण्यासाठी खाजगी दवाखान्याची वाट धरावी लागते .त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही गोष्टींचे नुकसान होते.
स्थानिक नागरिकांची प्रमुख मागणी…
कामात कुचराई करणाऱ्या आणि सतत गैरहजर असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरीकांकडून होत आहे. ग्रामीण भागातील पारोडी येथील हे आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत असल्याने कामावर नसतानाही हजेरी दाखवून कर्मचाऱ्यांचे पगार नक्की कोण करत…? वरीष्ठ आधिकारी काय करतात याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
पारोडी ग्रामस्थ संतापले…
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टरांचे झालेले निलंबन यामुळे आधीच सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांची विश्वासहर्ता पणाला लागली आहे. त्यात पारोडी येथे डॉक्टर आणि कर्मचारी सतत गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पारोडी हे प्राथमिक आरोग्य केंद्र असून शिवतक्रार म्हाळुंगी, सातकरवाडी, कोकरेवस्ती, येळे वस्ती, पिराची वस्ती, या ठिकाणांहून नागरिक उपचारासाठी येथे येतात. परंतु पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नाही. त्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तसेच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत डॉक्टरांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू .
संजय खेडकर (ग्रामसेवक, पारोडी)
या आधीही ग्रामपंचायत कडून दवाखान्याला लेखी पत्र देण्यात आले होते. पुन्हा संबंधित वरिष्ठांना या विषयावर ग्रामपंचायतमार्फत पत्रव्यवहार केला जाईल.
कमल शिवले (सरपंच, पारोडी)
डॉक्टर वेळेत उपस्थित नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. कधी दवाखाना बंद असतो तर कधी दवाखाना चालू असून डॉक्टर नसतात. त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
ज्ञानेश्वर टेमगिरे (ग्रामस्थ, पारोडी)
शिरुर; वाळूमाफिया आणि माती चोरांसाठी हवेलीतील बड्या नेत्याचा महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव…?