राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा ठरला…

इतर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाला अभिवादन करणार, विदीप जाधव कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

मुंबई: राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पहिला अधिकृत दौरा निश्चित झाला आहे. येत्या दोन दिवसांत त्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून कराड येथील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. यानंतर विमान अपघातात निधन झालेले अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची त्या सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्यातील वेगवान राजकीय घडामोडीनंतर शनिवारी दुपारी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विधिमंडळ सभागृह नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राज्यपाल भवनात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक व वक्फ, क्रीडा तसेच मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले होते. या भीषण अपघातात त्यांच्यासोबत आणखी पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांचाही समावेश होता. विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते आणि ते सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव गावचे रहिवासी होते.

विदीप जाधव यांच्या पार्थिवावर 29 जानेवारी रोजी त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली जाण्याने पोलीस दल, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेतली होती. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वतः त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत.

सुनेत्रा पवार यांचा हा दौरा राजकीय आणि भावनिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, सातारा जिल्ह्यातील त्यांच्या पहिल्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.