शिरूर तालुक्यात दुचाकी-चारचाकी अपघातात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

शिरूर तालुका

श्रीगोंदा येथील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांदळी गावच्या हद्दीत कळसकरवाडी येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 1 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला असून, श्रीगोंदा येथील आरोपी चालकाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत व्यक्ती दिलीप दगडू शिंदे (वय ५०), रा. इनामगाव, ता. शिरूर, जि. पुणे) हे त्यांच्या ताब्यातील बजाज कंपनीची सी.टी. 110 एक्स मोटारसायकल (MH12TP4081) वरून जात असताना, महेश शिवाजी तावले (रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) या आरोपीने चालवलेल्या महिंद्रा कंपनीच्या चारचाकी वाहन (MH14GA8624) ने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की, दिलीप शिंदे यांना अपघातात गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आरोपी चालकाने भरधाव वेगात, निष्काळजीपणे आणि अविचाराने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे फिर्यादी सतिष दिलीप शिंदे (वय 38, धंदा शेती, रा. इनामगाव, ता. शिरूर) यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे मोटार वाहन कायद्यानुसार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गवळी करत असून, सदर गुन्हा पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधीन आहे.