भुमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना मोजणी नकाशा मिळवण्यासाठी मारावे लागतात वारंवार हेलपाटे

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर भुमी अभिलेख कार्यालयात मोजणी होऊनही महीनोमहिने ‘क’ प्रत (मोजणी नकाशा) मिळत नसल्याच्या तक्रारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना वारंवार भुमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असून संबंधित कर्मचारी हे नागरीकांना उडवाऊडवीची उत्तरे देत आहेत. तसेच संबंधित मोजणी झालेली प्रकरणे व मोजणीसाठी प्रलंबित असलेली प्रकरणे यांचा कोणत्याही प्रकारचा मेळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लागत नसल्याचे वास्तव चित्र दिसत आहे.

तसेच भुमी अभिलेख कार्यालयामध्ये मंजूर असणारे कर्मचारी यांची संख्या नगण्य असून रीक्त पदांची संख्या जास्त आहे. कार्यालयामध्ये नियुक्त केलेले कर्मचारी हे त्यांच्या मुळ नियुक्तीच्या पदावरून इतर पदावर काम करत असल्याचे अ‍ॅड सागर दरेकर यांनी सांगितले आहे. तसेच छानणी लिपिक पदावर काम करणारे कर्मचारी यांना कार्यालयीन कामाचा मेळ लागत नसून त्यांच्या ताब्यात असणारे मोजणी पुर्व प्रकरणे व मोजणी झालेली प्रकरणे यांची कोणत्याच प्रकारे नोंद नोंदवहीतआढळून येत नसल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

गेल्या ६ महीन्यापासून दरेकर यांचे मोजणी झालेले प्रकरण छानणी लिपिक व अभिलेख पाल यांच्या कडे मिळून येत नाही. त्यामुळे त्यांनी या कार्यालयाच्या कारभाराला कंटाळून दरेकर यांनी जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख पुणे यांच्याकडे लेखी तक्रार केली असुन सदर प्रकरण येत्या आठ दिवसात न मिळाल्यास भुमि अभिलेख कार्यालयात आत्मदहन करण्याच्या इशारा दिला आहे. शिरुर तालुक्यात असे अनेक शेतकरी वारंवार ‘क’ प्रत मिळवण्यासाठी हेलपाटे मारत असून वरिष्ठ आधिकाऱ्यांनी याची दखल घेणे गरजेचे आहे. तसेच मोजणीच्या दिवशी भुकरमापक येत नसल्याच्या तक्रारीही मोठया प्रमाणावर येत आहे. भुमी अभिलेख कार्यालयामध्ये अनेक झिरो साहेबांचा प्रचंड वावर असून सरकारी कागदपत्रे त्यांच्या शिवाय हालत नसल्याचे दिसुन येत आहे. तात्काळ त्यांना हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या प्रलंबित प्रकरणांची माहिती घेण्याचे काम हाती घेतले असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोजणी नकाशे उपलब्ध करुन दिली जातील.

गणेश कराड, 

नवनिर्वाचित, प्रभारी उपअधिक्षक

भुमी अभिलेख