निकालानंतर शहरात तणाव! भाजपच्या विजयी उमेदवारावर हल्ल्याचा आरोप

महाराष्ट्र राजकीय

नाशिक: नाशिक महापालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील वातावरण तापल्याचे चित्र आहे. नाशिकरोड परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे विजयी उमेदवार शरद मोरे यांच्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

शरद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी त्यांना कानशिलात लगावत मारहाण केली. या घटनेदरम्यान मारहाण करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला महिलांनीच चोप दिला, असा दावाही मोरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, हल्ला करणाऱ्या तरुणाच्या कमरेला बंदूक असल्याचेही त्यांनी सांगितले.

पवन पवार समर्थकांवर हल्ल्याचा आरोप

पोलीस दप्तरी फरार असलेले पवन पवार यांच्या मातोश्री प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या पराभवानंतर पवन पवार समर्थकांनीच आपल्यावर हल्ला केला, असा आरोप शरद मोरे यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी रात्री उशिरा शरद मोरे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

सोमवार पेठेतही तणाव

दरम्यान, प्रभाग क्रमांक 13 मधील सोमवार पेठ परिसरातही तणावपूर्ण घटना घडली. शिवसेनेचे पराभूत उमेदवार गणेश मोरे यांच्या घरासमोर अज्ञात तरुणांनी फटाके फोडून शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. मात्र, परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी गणेश मोरे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

निवडणुकीनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी संबंधित भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, दोन्ही घटनांचा तपास सुरू आहे.

नाशिक महापालिका निवडणूक निकाल 2026

एकूण जागा : 122

भाजप – 72

शिंदे गट शिवसेना – 26

ठाकरे गट शिवसेना – 15

राष्ट्रवादी (अजित पवार) – 04

काँग्रेस – 03

मनसे – 01

अपक्ष – 01

नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता

नाशिक महापालिकेवर ‘शंभर प्लस’चा नारा देणाऱ्या भाजपने 72 जागा जिंकत पुन्हा एकहाती सत्ता मिळवली आहे. महापालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा 62 असून, भाजपने तो सहज पार केला आहे. शिंदे गटाला 26 जागांवर समाधान मानावे लागले, तर ठाकरे गटाने 15 जागा जिंकत उपस्थिती ठळक केली आहे. भाजपने मागील निवडणुकीच्या तुलनेत सहा जागांची वाढ करत आपले वर्चस्व कायम राखले आहे.