राजकीय तणाव! शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक

क्राईम महाराष्ट्र

नंदुरबार: शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदूरबार शहर पोलीसांनी अटक केली आहे. चौधरी यांच्यावर दरोडा आणि अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होता, त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

अटक झाल्यानंतर शिरीष चौधरी यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात माजी आमदारांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या अटकेमुळे नंदुरबारमधील राजकीय वातावरण तापले असून, पोलीस आता पुढील कारवाईवर लक्ष केंद्रित करत आहेत.

माजी आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांना उपनगराध्यक्ष पद मिळाल्यानंतर शहरात विजय मिरवणूक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकीत वाद झाला होता आणि रात्री शिरीष चौधरी यांच्या घराची तोडफोडही करण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

माजी मंत्री अनिल पाटील यांनी शिरीष चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, “नंदुरबारमध्ये गुंडशाही सुरू आहे, ती सहन केली जाणार नाही.” पाटील यांच्या मते, चौधरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीच्या नावाखाली दहशत निर्माण केली, अंगप्रदर्शन केले, चिथावणीखोर वर्तन केले तसेच भरवस्तीत जाऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार तसेच महिलांना जातिवाचक शिवीगाळ केली. त्याचबरोबर, शिरीष चौधरी यांच्या कुटुंबावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही आरोप आहेत. गुजरातमध्ये बनावट दारू विक्री, खंडणीसारख्या गुन्ह्यांत या कुटुंबाचा सहभाग असल्याचे पाटील यांनी सांगितले. नंदुरबारमधील या घटनांमुळे राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले असून, शहरवासीय आणि राजकीय नेते पोलीस कारवाईकडे लक्ष ठेवत आहेत.